ओल्या दुष्काळाचे संकट, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे आज मराठवाड्यात

861

परतीच्या पावसाने मराठवाड्यात अस्मानी संकट कोसळले आहे. लाखो हेक्टरवरील पिकांची माती झाली असून शिवारात दलदल माजली आहे. हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास अतिवृष्टीने हिरावून नेल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अडचणीत आलेल्या या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवार, 3 नोव्हेंबर रोजी मराठवाडय़ात येत आहेत. उद्धव ठाकरे हे ओल्या दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

संपूर्ण पावसाळा कोरडाठाक गेल्यानंतर पावसाने परतीच्या प्रवासात धूमशान घातले. राज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले. मराठवाडय़ात अतिवृष्टीमुळे शिवारात चिखलाचे साम्राज्य पसरले असून सोयाबीन, कापूस, मका, बाजरी ही हाताशी आलेली पिके नेस्तनाबूत झाली आहेत. हजारो हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्या आहेत. कोकणातील भातशेती खरवडून गेली असून पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील द्राक्षबागा तर खान्देशातील केळीच्या बागा उन्मळून पडल्या आहेत. शेतकरी, शेतमजूर, बागायतदार चिंताग्रस्त आहेत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली होती.

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी सकाळी 11 वाजता संभाजीनगर जिल्हय़ातील कन्नड तालुक्यातील कानडगाव येथे भेट देऊन शेतशिवाराची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता ते वैजापूर तालुक्यातील गारज येथे शेतकऱयांशी संवाद साधतील. दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे विभागीय आयुक्तालयात प्रशासकीय अधिकाऱयांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार असून दुपारी 3 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या