
हिवाळ्यात आवळा बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागतो. आवळा हा कोणत्याही सीझनमध्ये खाणे हे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जाते. सुपरफूड मानला जाणारा आवळा हा औषधापेक्षा कमी नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते आरोग्य सुधारण्यापर्यंत आवळा हा फार उपयुक्त मानला जातो.
आवळा हा एक सुपरफुड म्हणून ओळखला जातो. त्यात भरपूर व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप उत्तम मानले जाते. आवळ्यात पॉलिफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन असतात. जे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आवळा कोलेस्टेरॉलची पातळी सुधारून आणि जळजळ कमी करून हृदयाच्या आरोग्याला आधार देऊ शकतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की, आवळ्यातील अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे त्वचा, चयापचय आणि एकूण पेशी संरक्षणासाठी फायदे होऊ शकतात.
कच्च्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, तसेच आहारातील फायबर, पॉलीफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिनचे प्रमाण जास्त असते.
आवळ्याचा रस काढल्याने बहुतेक फायबर निघून जातात. यामुळे शरीराला हवे तेवढे पोषक घटक मिळत नाहीत. आवळ्याच्या रसातील व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉल जलद शोषले जातात. संशोधनातून असे दिसून आले आहे की, ताज्या फळांच्या तुलनेत रसातील व्हिटॅमिन सीचे प्रमाण कालांतराने कमी होते.
कोणता पर्याय आरोग्यदायी आहे?
कच्चा आवळा आणि आवळ्याचा रस दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, परंतु कच्चा आवळा हा दीर्घकाळ सेवनासाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे. आवळा संपूर्ण खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात, जे पचन आणि आतड्यांच्या आरोग्यास मदत करतात. कच्च्या आवळ्याच्या फायबरयुक्त पोतामुळे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हळूहळू बाहेर पडतात.

























































