अकलूजला पाच दिवसाआड पाणीपुरवठा, पाण्यासाठी जनता बेजार; नेत्यांची आश्वासने ठरली फुसका बार

लोकसभा निवडणुका संपल्यानंतर दुसऱयाच दिवसापासून अकलूज व परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ सुरू झाली आहे. दोन दिवसाआड असलेला पाणीपुरवठा निवडणुकीनंतर चक्क पाच दिवसांनंतर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली असून, निवडणूककाळात उमेदवारांनी जनतेला दिलेली पाण्याची आश्वासने फुसका बार ठरल्याची चर्चा सुरू आहे.

माढा लोकसभा निवडणूक शेती व पिण्याचे पाणी या मुद्दय़ावर गाजली. निवडणूककाळात जनतेला आश्वासनांबरोबरच पाणी ही मुबलक मिळाले. निवडणुका संपल्या आणि आश्वासन देणाऱया उमेदवारांबरोबरच पाणीही गायब झाले. अकलूज व परिसरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

शेतीला पाणी नाही, त्यामुळे उभी पिके करपू लागली आहेत. पाणीपट्टी वर्षाची तरीही कमी दाबाने पाच दिवसाआड मिळणारे मोजकेच पाणी. पाण्यासाठी दिवसभर लोकांची वणवण. अशातच टँकरचालक सरासरी दीड ते दोन रुपये लिटर व फिल्टर जारवाले कोणतीही प्रशासकीय परवानगी नसताना 30-40 रुपये प्रतिजार विक्री करत आहेत.

यशवंतनगर, संग्रामनगर व अकलूज परिसराला विझोरी येथील पाणीपुरवठा तळ्यातून पिण्यासाठी पाणी दिले जाते. या तळ्याची साठवण क्षमता 280 मिलियन लिटर असून, गाळउपसा न केल्याने सध्या या तळ्यात फक्त 190 मिलियन लीटर पाणी साठते. सध्या तळ्यामध्ये सुमारे 90 मिलियन लीटर पाणी शिल्लक आहे. तीन गावांतील सुमारे 90 हजार नागरिक व या परिसरात येणारे सुमारे 10 हजार प्रवासी नागरिक अशा सुमारे 1 लाख लोकांना येत्या 14 जूनपर्यंत हे पाणी पुरवायचे आहे. प्रतिमाणसी 110 लीटर पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली.

टँकर येण्यासाठीही लागतोय वेळ

z पाच दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांचे पिण्यासाठी व वापरण्यासाठी हाल होत आहेत. सुमारे 7 हजार लिटर क्षमतेचा टँकर शहरांतर्गत 1000ते 1200 रुपये दराने मिळत आहे. 7 हजार लिटर पाणी भरून घेण्यासाठी टँकरचालकांना अडीचशे ते तीनशे रुपये द्यावे लागतात. ड्रायव्हर पगार, वाहतूक व डिझेल इंजिनचा खर्च सुमारे 500 रुपये होतो. टँकर भरणे आणि रिकामा करणे यामध्ये टँकरचालकाचे सुमारे 3 ते 4 तास खर्ची पडतात. म्हणजेच एका टँकरमागे टँकर मालकाला 500 ते 600 शिल्लक राहतात. सध्या अकलूज परिसरात टँकर कमी आणि मागणी जास्त असा प्रकार सुरू असल्याने आज मागवलेला टँकर उद्या मिळत आहे. पाणीपुरवठा 5 दिवसाआड गेल्यामुळे नागरिकांना ना इलाजाने बोअरचे पाणी विकत घ्यावे लागतेय. हे पाणी फिल्टर करण्यासाठी लागणाऱया वॉटर फिल्टरच्या मागणीतही त्यामुळे वाढ झाली आहे. त्यामुळे या टंचाईच्या काळात टँकर, जार पुरवठा करणाऱयांना सुगीचे दिवस आले आहेत.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन

z यशवंतनगर, संग्रामनगर व अकलूज या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वीर -भाटघर धरणातून नीरा उजव्या कालव्यामार्फत केले जाते. पुढची पाणी पाळी 15 जून रोजी मिळणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे. अंगणात पाण्याचा सडा मारू नये. गाडय़ा धुण्यावर जास्त पाणी खर्च करू नये. सांडपाण्याचा वापर आपल्या परिसरातील झाडे जगवण्यासाठी करावा, असे आवाहन अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.