नवीन पॉलिसी स्वीकारण्याची मुदत संपली व्हॉट्सऍप सुरूच राहणार पण…

व्हॉट्सऍपची नवीन पॉलिसी आज 15 मेपासून लागू झाली आहे. तमाम युजर्ससाठी दिलासादायक बाब म्हणजे सध्यातरी कुणाचेच व्हॉट्सऍप अकाऊंट डिलीट होणार नाही. मात्र कालांतराने पॉलिसी न स्वीकारणाऱया व्हॉट्सऍप युजर्सची ‘फंक्शनलिटी’ कमी होईल. म्हणजेच त्यांच्या व्हॉट्सऍप अकाऊंटवर काही फीचर्स बंद होतील, असे कंपनीने सांगितले आहे.

व्हॉट्सऍपच्या नव्या पॉलिसीविरोधात युजर्समध्ये नाराजी आहे. पॉलिसीमुळे युजर्सच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याची तक्रार आहे. अशातच व्हॉट्सऍपने 15 मे ही पॉलिसी स्वीकारण्याची डेडलाईन दिली होती. तसे मेसेज युजर्सला पाठवले जात होते. आज ही डेडलाईन उलटून गेली असली तरी असे ‘रिमांइंड’ मेसेज कंपनीतर्फे यापुढेही पाठवले जाणार आहेत. सध्यातरी व्हॉट्सऍप युजर्सचे अकाऊंट बंद होणार नसले तरी काही फीचर मर्यादित केले जाणार आहेत. त्याचीच जाणीव रिमांइंड मेसेजमधून करून दिली जाणार आहे.

कोणते फीचर बंद होतील…

सध्या लिमिटेड फंक्शनॅलिटीमध्ये अकाऊंट जाऊ शकते. व्हॉट्सऍपची पॉलिसी न स्वीकारल्यास चॅट लिस्टचा वापर करता येणार नाही. मात्र दुसऱया युजर्सला चॅट मिळेल. फक्त नोटीफिकेशनच्या माध्यमातून ते वाचू आणि रिप्लाय देऊ शकतील. युजर्स इनकमिंग आणि आऊटगोइंग कॉल करू शकतील. तूर्तास तरी व्हॉट्सऍप ऑडियो आणि व्हिडियो कॉलचे उत्तर देता येईल.

काय आहे नवीन पॉलिसी

युजर जो कंटेंट अपलोड, सबमीट, स्टोअर, सेंड किंवा रिसिव्ह करतात, व्हॉट्सऍप कंपनी त्याचा वापर कुठेही करू शकते. कंपनी तो डेटा शेअरही करू शकते. यापूर्वी युजरने पॉलिसीला स्वीकारले नाही, तर अकाऊंटचा वापर करता येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे पर्यायी करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या