
व्हॉट्सअॅपने हिंदुस्थानी पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पाळत ठेवून हेरगिरी केल्याचे खळबळजनक वृत्त आहे. इस्रायलच्या एका सॉफ्टवेअर कंपनीने डिझाइन केलेल्या स्पायवेअरद्वारे ही हेरगिरी केली आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानात लोकसभा निवडणुका होत्या तेव्हा मे महिन्यात ही हेरगिरी झाली. दरम्यान, केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपकडे 4 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे.
फेसबुकच्या मालकीचे इंस्टंट मेसेजिंगअॅप व्हॉट्सअॅप हे जगभरात लोकप्रिय आहे. सायबर हेरगिरीचा प्रकार झाल्याचे व्हॉट्सअॅपने मान्य केले असून, इस्रायलच्या एनएसओ ग्रुपविरोधात कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. दरम्यान जगभरात 1.3 अब्ज युजर्स असून, हिंदुस्थानात 40 कोटी युजर्स असल्याची माहिती आहे.
व्हॉट्सअॅपने कशी केली हेरगिरी?
इस्रायलच्या सॉफ्टवेअर कंपनीने स्पायवेअर डिझाइन केले. हॅकर्सनी स्पायवेअरला पिगासस या नावाचे टुल तयार करून घेतले.
गुगल ड्राईव्ह किंवा आय-कोल्डचा डेटा ऍक्सेस करण्याची क्षमता स्पायवेअर पिगाससमध्ये आहे. व्हॉट्सअॅपप्रमाणेच फेसबुक मेसेंजरसुद्धा ऍक्सेस करण्याची क्षमता यात आहे. इस्रायलच्या एनएसओ सॉफ्टवेअर कंपनीने डिझाइन केलेल्या या स्पायवेअरद्वारे जगातील चार खंडातील सुमारे 1400 मोबाईल हॅक केल्याची प्राथमिक माहिती आहे.
युजर्सला व्हिडीओ कॉल येतो आणि कॉलला उत्तर देण्यापूर्वीच स्पायवेअर पिगासस मोबाइलमध्ये सोडले जात असे. त्यानंतर युजर्सवर पाळत ठेवली जात होती. व्हॉट्स अॅपची माहिती चोरण्यात आली. यामध्ये हिंदुस्थानातील काही पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि विचारवंतांचा डेटा चोरला आहे. ही सायबर हेरगिरी एप्रिल ते मे महिन्यात झाली. त्याच काळात हिंदुस्थानात लोकसभेच्या निवडणुका होत्या.
हिंदुस्थानी नागरिकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास सरकार कटीबद्ध आहे. त्यामुळे हेरगिरी होत असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन व्हॉट्सअॅपकडून तातडीने सविस्तर खुलासा मागितला आहे.
– रविशंकर प्रसाद, केंद्रीय दूरसंचार मंत्री
केंद्र सरकारच्या एजन्सींकडून नागरिकांवर हेरगिरी केली जात आहे. इस्रायलच्या ‘एनएसओ’कडून हिंदुस्थानातील विरोधी पक्षांचे नेते, पत्रकार, न्यायमूर्तींचे फोन हॅक केले गेले आहेत. याप्रकरणाची दखल सुप्रीम कोर्टाने स्वतःहून घेतली पाहिजे.
– रणदीप सुरजेवाला, काँग्रेस
























































