
शिक्षण विभागाची मान्यता न घेता सुरू असलेल्या अनधिकृत शाळांवरील कारवाई रखडली आहे. काही शाळांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई झाल्यानंतर आता शिक्षण विभागातील अधिकाऱयांनीच या कारवाईकडे दुर्लक्ष केल्याने मुंबई, पुणेसह राज्यात मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत शाळांना मोकाट सोडण्यात आल्याचा आरोप पालक संघटनांकडून केला जात आहे.
मागील आठवडय़ात शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या 486 अनधिकृत शाळांची तपासणी करून तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते, तर त्याचदरम्यान धारावी येथील एका इंग्रजी शाळेच्या विरोधात पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता, मात्र त्यानंतर अनेक शाळा सुरू असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे पालक संघटनांचे म्हणणे आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अनधिकृत शाळांवर तातडीने कारवाई करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यात मुंबईतील 230, ठाणे 119, रायगड 8 आणि पालघरमधील 126 शाळा आहेत. या अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई करणे, या शाळांनी दंडाची रक्कम जमा न केल्यास त्यांच्या सातबारावर बोजा चढवावा, या शाळांवर आवश्यकतेप्रमाणे गुन्हे नोंदवावेत तसेच शाळा बंद कराव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. तर अनधिकृतपणे सुरू असलेल्या या शाळांमधील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचेही आदेश सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक आदींना देण्यात आले आहेत, मात्र मागील काही दिवसांत या शाळांवर करण्यात येणाऱया कारवाया रखडल्या आहेत.




























































