
>> साधना गोरे
आपल्या मेंदूत सतत असणारी भाषा आणि स्वयंपाकघरातील अग्नी या दोन गोष्टींना मानवी इतिहासात अनन्यसाधरण महत्त्व आहे. कारण अग्नी आणि भाषा यांच्या शोधानंतर इतिहासात आधी आणि नंतर अशी स्पष्ट सीमारेषा तर निर्माण झालीच, पण त्यामुळे मनुष्याचं आयुष्य अधिक सुखकर झालं. भाषेमुळे माणूस आपल्या भावना, विचार व्यक्त करू लागला.
जंगलातला वणवा सगळं जंगल गिळंपृत करत असल्याचा अनुभव आदिम अवस्थेतील मानवाने कित्येकदा घेतला असणार, त्यावरूनच पोटात काहीही ढकलण्याची इच्छा होणाऱया जाणिवेला म्हणजे भुकेला ‘आग’ म्हटलं गेलं असावं. पोटात आग पडलीय, भुकेचा डोंब उसळलाय अशा प्रयोगांतून क्षुधेची तीव्रता अधोरेखित होते. हिंदू संस्पृतीत अंत्यविधीला अग्नी देण्याचा संस्कार असतो, शिवाय विवाहामध्येही त्याला महत्त्वपूर्ण स्थान असतं.
संस्पृतमधील ‘अग्नी’ शब्द ‘गिनी’, ‘अग्गी’, ‘अग्गी’ अशी रूपं बदलत मराठी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये ते ‘आग’ असं झालं. तर सिंधीमध्ये ‘अगी’, पंजाबीमध्ये ‘अग्गं’, मैथिलीमध्ये ‘आगी’, बंगालीमध्ये ‘आगुन’, ओरियामध्ये ‘णिअ’, कश्मिरीमध्ये ‘ओगुन’, सिंहलीमध्ये ‘अग’ असे त्या त्या भाषेच्या स्वभावाप्रमाणे ‘अग्नी’ची रूपं बदलत गेलेली दिसतात.
एखादी भाषा म्हणजे त्या भाषक समूहाची अनुभव घेण्याची पद्धत, जगण्याची एक रीत, परंपरा असते. विशेषतः त्या त्या भाषेतील म्हणी आणि वाक्प्रचार यांमध्ये हे लख्ख दिसतं. वनात पाहिलेली आग हा मानवाचा अग्नीचा पहिला अनुभव! त्यावरूनच त्याला ‘वण’वा म्हटलं गेलं असावं.
आग असल्याशिवाय धूर होत नाही, आग लावणं, आगीत तेल ओतणं, तळपायाची आग मस्तकात जाणं, अंगाची आग आग किंवा लाहीलाही होणं, आग लागल्यावर विहीर खणणं, आगलाव्या अन् बोंबमाऱया, आग लावील अन् विझली की नाही जाऊन पाहील, कोणी आग व्हावं कोणी पाणी व्हावं, आगीतून उठून फुफाटय़ात पडणं, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी इ. म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ उलगडून सांगायला लागू नये इतक्या प्रमाणात त्यांचे प्रयोग आजही मराठीत केले जातात.
चूल पेटवण्याचा अनुभव घेतलेल्यांना ‘अग्नी काडय़ांनी पेटतो अन् मोठय़ा लाकडाने विझतो’ या म्हणीतला मथितार्थ लगेच उमजेल. चूल पेटवताना सुरुवातीला बारीक काडय़ा, गोवऱ्या यांनीच चूल चांगली पेट घेते. सुरुवातीलाच मोठं लाकूड वापरलं तर अग्नी पेट घेण्याऐवजी विझतो. म्हणून एखादी लहान वस्तू जे कार्य करू शकते, ते मोठय़ा वस्तूने होत नाही. उलट काम बिघडते, या अर्थाने ही म्हण वापरली जाते.
प्रत्येकाचा आपापला स्वभावधर्म असतो, ते त्यांच्या स्वभावधर्माविरुद्ध वागूच शकत नाहीत. कारण तीच त्यांची ताकद असते, या अर्थाने ‘सूर्य शिळा अग्नी सोवळा आणि गंगा पारोशी म्हणता येत नाही’, अशी म्हण आहे. गरम गोष्ट ताजी असते. मग सूर्य तर इतका तप्त असतो की, त्याला शिळा म्हणताच येत नाही. सर्व जातीधर्मातील घराघरांत चुलीच्या रूपात अग्नीचं अस्तित्व असल्यामुळे अग्नी शुद्ध, सोवळा असू शकत नाही, तर जलरूप असणारी गंगा म्हणजे नदी ही स्वतः सगळ्या जगाला न्हाऊ घालते. तेव्हा ती पारोशी असण्याचा प्रश्नच उद्भवू शकत नाही.
प्रत्यक्ष आगीपेक्षा पोटाची आग अधिक वाईट असते, या अर्थाने ‘कोरडी आग पुरवते, पण ओली आग पुरवत नाही’ असं म्हटलं जातं. ओली आग म्हणजे अतिवृष्टी. महापुरात घरादाराच्या नुकसानीबरोबर शेतीचं नुकसान होऊन नंतर धान्यही पिकवता येत नाही. परिणामी भुकेचा प्रश्न निर्माण होतो. प्रत्यक्ष आग लागली तर त्यात काहीच भागाची हानी होत असल्याने इथे नाही तर तिथे जाऊन मनुष्याला भूक भागवता येते, पण अतिवृष्टीचा परिणाम मोठ्या प्रदेशावर होत असल्याने तिथल्या सर्वच माणसांच्या भुकेचा प्रश्न निर्माण होतो.
एखाद्या संकटाला नुकतीच कुठे सुरुवात झालीय, पण मुख्य संकट अजून दूर आहे. अशा वेळी ‘अंगठय़ाला किंवा नखाला आग लागणे’ हा वाक्प्रचार वापरला जातो. अंगठाच का? याचा विचार करताना असं दिसतं की, हिंदू धर्मात प्रेताला अग्नी देताना प्रथम पायाकडून म्हणजे अंगठय़ाकडून अग्नी दिला जातो. तेव्हा अंगठय़ाजवळ म्हणजे सुरुवातीच्या टप्प्याला संकट आहे तोवरच सावध झालं तर पुढे चालून येणारं मोठं संकट परतवून लावता येईल. सद्यस्थितीत पहिलीपासून तिसऱया भाषेच्या निमित्ताने हिंदीची आग अंगठय़ाला लागलीय तेव्हाच सावध होऊन लढायचा संकल्प करू या!