
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रायगड जिल्ह्यात सरासरी 3 हजार मिली पावसाची नोंद दरवर्षी होत असते. मात्र तरीही टँकरमुक्त जिल्हा होण्याचे स्वप्न आजही अपूर्णच राहिलेले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी पाणी टंचाई असलेल्या गाव वाड्यामध्ये पाणी साठा करून ठेवण्याबाबत कोणतीही ठोस योजना जिल्हा प्रशासनाकडून कायमस्वरूपी करण्यात आलेली नाही. त्यामुळे जानेवारी महिना सुरू होताच ग्रामीण भागात महिला वर्ग पाण्यासाठी हंडे घेऊन फिरतानाचे विदारक चित्र दरवर्षी पाहण्यास मिळत असते. त्यामुळे पाणी टंचाई मुक्त रायगड कधी होणार हा प्रश्न अद्यापपर्यंत अधांतरीतच राहिलेला आहे.
जिल्ह्यात पाणी टंचाई समस्या दरवर्षी उद्भवत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पाणी टंचाई आराखडा तयार केला जातो. दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीसाठी हा पाणी टंचाई आराखडा केला जातो. यावर्षी 9 कोटी 40 लाखाचा पाणी टंचाई आराखडा ऑक्टोबर 2018 ते जून 2019 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे.
पाणी टंचाई समस्या कमी होताना दिसत नसली तरी दरवर्षी गाव, वाड्याची संख्या व रक्कम ही वाढलेली असते. जिल्ह्यात पेण, कर्जत, महाड, पोलादपूर या तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाई पाचवीलाच पुजलेली आहे. या तालुक्यात अनेक पाणी योजना केलेल्या आहेत. यावर करोडो रुपये खर्चही केला असून येथील पाणी टंचाई संपलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी दरवर्षी वणवण करावी लागत असते.
जिल्ह्यात राष्ट्रीय पेय जल योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, विंधन विहीर, विहिरी, जलयुक्त शिवार यातून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी योजना राबविल्या आहेत. तर झिंक टाक्याही पोलादपूर तालुक्यात बसविलेल्या आहेत. मात्र पाणी टंचाई पासून मुक्ती मिळणे जिल्हा प्रशासनाला अजून जमलेले नाही.
ज्या तालुक्यामध्ये दरवर्षी पाणी टंचाई समस्या उद्भवते अशा ठिकाणी पाणी साठवणी करणे गरजेचे आहे. तसेच पाण्याचे स्रोत वाढविण्यासाठी उपाय योजना करणे यावरही लक्ष केंद्रित करणे प्रशासनाचे काम आहे. मात्र पाणी टंचाई आराखडा करून पाणी टंचाईग्रस्त नागरिक हे पाण्यापासून वंचित राहतात. मात्र टँकर धारक हे मात्र पाण्याच्या पैशावर गब्बर होत चालले आहेत. अशी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे.
टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असलेली गाव, वाड्या
पेण तालुक्यातील 64, पोलादपूर 46, कर्जत 24, मुरुड, तळा, रोहा, 1, महाड 7, पनवेल 2 या तालुक्यातील गाव, वाड्यावर पाणी टंचाई आहे. या ठिकाणी टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. एकूण 22 टँकरची गरज असताना प्रत्यक्षात 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केलेला आहे. पेण 6, पोलादपूर 4, मुरुड 1, तळा 1, रोहा 1, कर्जत 3, महाड 2, पनवेल 1 या तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे.
साधी विहीर खोलीकरण व गाळ काढण्यासाठी 5 लाख 10 हजार रक्कम प्रस्तावित केलेली असून 10 गाव व वाड्यावर हे काम करायचे आहे. मुरुड व महाड गटाकडून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. मात्र प्रस्ताव आलेले नसल्याने काम अपुरी आहेत. तर जिल्ह्यातील 31 गाव व वाड्यावर नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती साठी 1 कोटी 2 लाख 82 हजार रक्कम प्रस्तावित केले आहेत. माणगाव मध्ये 2 प्रस्ताव मंजूर झाले असून महाड मधील 2 दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेले आहेत. तर पोलादपूर व कर्जतमधील प्रस्ताव निकषात बसत नाहीत.
नवीन विंधण विहीर खोदाई
नवीन विंधण विहीर खोदाईसाठी 3 कोटी 31 लाख 76 हजार रुपये आराखडा मंजूर केलेला आहे. यामध्ये 572 गाव व वाड्या प्रस्तावित असून 227 गाव, वाड्यांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. तर अद्यापपर्यंत 20 गाव, वाड्यामधील विंधण विहिरींची कामे पूर्ण झाली असून 207 विंधण विहिरींची कामे अपूर्ण आहेत. तर विशेष विंधण विहीर दुरुस्तीसाठी 41 लाख 82 हजारांचा आराखडा मंजूर केलेला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 163 गाव व वाड्या प्रस्तावित असून 113 गाव, वाड्यांच्या कामासाठी प्रशासकीय मान्यतासाठी प्रस्ताव पाठविलेले आहेत. यामध्ये 91 गाव वाड्याना मान्यता मिळालेली असून 26 विंधण विहिरींची दुरुस्ती पूर्ण झालेली आहे.

























































