
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
महिलांना 33 टक्के आरक्षणाची तरतूद असणारे विधेयक राज्यसभेत 2010 मध्ये मंजूर झाले, मात्र लोकसभेत ते अजूनही पारित होऊ शकलेले नाही. महिला सबलीकरणाच्या गप्पा एकीकडे मारता आणि दुसरीकडे आठ वर्षे झाली तरी हा विषय मार्गी लावत नाहीत. हे योग्य नाही. महिला आरक्षण विधेयक कधी पारित करणार, असा खडा सवाल आज राज्यसभेत सर्वपक्षीय महिला खासदारांनी उपस्थित केला.
राज्यसभेत आज शून्य प्रहरात महिला खासदारांना हा विषय मांडण्याची परवानगी सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिली. त्यावर बोलताना सर्वपक्षीय महिला खासदारांनी महिला आरक्षणाचा विषय सरकारने तातडीने मार्गी लावावा अशी जोरदार मागणी लावून धरली. समाजवादी पार्टी महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात असल्याचा भ्रम जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. महिला आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे. मात्र 33 टक्के आरक्षित जागा कोणत्या हे ठरविण्याचा अधिकार संबंधित राजकीय पक्षाला द्यायला हवा, अशी भूमिका समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी मांडली. तेलगू देसमच्या टी. सीताराम लक्ष्मी यांनी सरकारने लोकसभेत तातडीने महिला आरक्षण विधेयक पारित करावे अशी आग्रही भूमिका मांडली. अण्णा द्रमुकच्या विजिला सत्नयाथ यांनी लोकसभेत सत्तापक्षाला पूर्ण बहुमत असल्याने महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा आशावाद व्यक्त केला. सभागृहातील उजवीकडे बसणारा सत्ताधारी पक्ष, डावीकडचा विरोधी पक्ष व मधल्या बाकावरील सदस्यांचाही महिला आरक्षाण विधेयकाला पाठिंबा असतानाही गेल्या आठ वर्षांपासून हे विधेयक प्रलंबित आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आता महिला आरक्षण विधेयक मंजूर व्हायलाच हवे, अशी आग्रही भूमिका द्रमुकच्या कनिमोझी यांनी यावेळी मांडली.
माकपाच्या झरना दास वैद्य यांनी लोकसभेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजप सरकार महिला आरक्षणाचा विषय मार्गी लावत नसल्याची टीका केली.
महिला आरक्षणाचे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. ते त्यांनी पाळावे हीच त्यांच्यासाठी संधी आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या बिप्लव ठाकूर यांनी काँग्रेसची भूमिका मांडली.




























































