मोहम्मद शमी आहे कुठे? हरभजनचा निवड समितीवर हल्ला

शमी कुठे आहे? तो का खेळत नाही?’ हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने हा थेट सवाल उपस्थित करत संघ निवडीच्या प्रक्रियेवर बोट ठेवले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी गोलंदाजी करत असतानाही मोहम्मद शमीला हिंदुस्थानी संघात स्थान न दिल्याने क्रिकेट विश्वात नाराजीचे सूर उमटत आहेत. अनेक माजी खेळाडूंनी निवड समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, शमीसारख्या अनुभवी मॅचविनरला डावलण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट मत मांडले जात आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना हरभजन म्हणाला, शमी हा खरा मॅचविनर आहे. गेल्या दशकात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांत त्याने संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. तंदुरुस्त आणि फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूकडे दुर्लक्ष होत असेल तर निवड व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होणारच.

हरभजनने बुमरावरील अतिवलंबाचाही उल्लेख करत इशारा दिला. बुमरा अप्रतिम गोलंदाज आहे, पण संघ एका व्यक्तीच्या खांद्यावर उभा नसतो. बुमरा नसतानासुद्धा सामना जिंकण्याची क्षमता संघात असली पाहिजे. त्यासाठी शमीसारख्या अनुभवी गोलंदाजाची नितांत गरज आहे.