
आपण बाहेरगावी गेल्यानंतर वाटेत थांबण्याचं ठिकाण म्हणजे हॉटेल. हॉटेलच्या खोल्यांमध्ये एक विशिष्ट ठेवण असते. त्यातही बऱ्याचशा हॉटेलमध्ये चादरींचा रंग हटकून पांढराच असतो. त्याच्यासोबत उश्यांचे अभ्रेही पांढरे असतात.
ते पाहून अनेकदा आपल्या प्रश्न पडतो, की जर याच चादरी गडद रंगाच्या असतील, तर त्या स्वच्छ करण्याचे श्रम वाचतील. आणि कमी डागाळल्यामुळे जास्त काळ वापरता येतील. पण, हॉटेल या विषयाचा विचार करताना एक वेगळा दृष्टिकोन ठरवलेला असतो. त्यामुळेच या चादरींचा रंग पांढरा ठेवला जातो. कोरा या प्रश्नोत्तराच्या संकेतस्थळावर या संबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यात आलं आहे.
पांढरा हा रंग अनेक कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पांढऱ्या रंगात सुखद आणि शांततेची भावना प्रतिबिंबित होत असते. दमलेला प्रवासी जेव्हा खोलीत प्रवेश करतो तेव्हा ती शांतता प्रवाश्याच्या मनात उतरते. पांढरा रंगामुळे छोटी खोली देखील प्रशस्त आणि मोठी वाटते. त्यामुळे देखील पांढरा रंग वापरला जातो.
तसंच, पांढरा रंग उष्णता शोषत नाही. त्यामुळे प्रवास करून आलेल्या, दमलेल्या व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या चादरीवर अंग टाकलं की त्या चादरीचा थंडावा शरीराला सुखद वाटतो. रंगीत चादरीत डाग राहून जाऊ शकतो. पण, पांढऱ्या रंगावर डाग पटकन दिसतात. पांढऱ्या चादरीवरचा न लपणारा डाग धुवून काढता येऊ शकतो.
पांढऱ्या रंगाच्या वापरात एक मानसशास्त्रीय कारणही आहे. पांढरा रंग हा मनातील संभ्रम दूर करतो आणि मनाला शांत करतो. त्यामुळे ग्राहकाला शांत वाटून झोप घेता यावी यासाठीच हॉटेलच्या खोल्यांमध्ये पांढऱ्या रंगाचं प्राबल्य दिसतं.




























































