पांढऱ्या रंगाचा स्वेटर घातल्याने शिक्षकाला तिघांनी चोपले

1632
fight
file photo

थंडीपासून बचाव व्हावा यासाठी एका शिक्षकाने घातलेला स्वेटर त्याला झालेल्या मारहाणीचे कारण ठरला आहे. पांढऱ्या रंगाचा स्वेटर घातल्याने या शिक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्यासोबतच त्याचा एक मित्रही होता, ज्यालाही मारहाण करण्यात आली. पेट्रोल पंपावर तीन गुंडांनी या दोघांना मारलंच शिवाय त्यांचा पाठलाग करत काही अंतरावर अडवून पुन्हा मारहाण केली असं शिक्षकाने नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सुदर्शन असं प्राध्यापकाचं नाव आहे. तो त्याच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी जात होता. त्याच्यासोबत त्याचा मित्रही होता. हे दोघेजण एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरायला थांबले होते. त्यावेळी तिथे बाईकवर बसलेले तिघेजण आले. या तिघांनी सुदर्शनकडे पाहून त्याच्यावर शेरेबाजी करायला सुरुवात केली. सुदर्शन हा कृष्णवर्णीय आहे आणि त्याने पांढऱ्या रंगाचा स्वेटर घातला होता. सावळा असूनही पांढऱ्या रंगाचा स्वेटर कसा काय घालतोस असं म्हणत बाईकवरून आलेल्या तिघांनी सुदर्शन आणि त्याच्या मित्राला घेरलं. त्यांनी सुदर्शनला शिव्या द्यायला सुरुवात केली.

तिघेही जण प्यायलेले असल्याने आपण वाद वाढवण्यात काही अर्थ नाही हे सुदर्शनला कळालं होतं. मात्र ते तिघे जण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी सुदर्शनला चेहऱ्यावर ठोसे मारले आणि जखमी केलं. सुदर्शनने त्यांना सॉरी म्हणून कशीकशी सुटका करून घेतली. मात्र यानंतरही त्या तिघांनी सुदर्शन आणि त्याच्या मित्राचा पाठलाग केला. काही अंतर दूर गेल्यानंतर तिघांनी सुदर्शन आणि त्याच्या मित्राला घेरलं आणि अडवून शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यांनी इथे सुदर्शन आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली आणि अंधाराचा फायदा उचलत तिघे पळून गेले. सुदर्शन आणि त्याचा मित्र पार्टीला न जाता घरी परत आले. सुदर्शनला कळालं होतं की आरोपी हे येणाऱ्या जाणाऱ्याला विनाकारण मारहाण करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि ते जिथे त्यांना मारहाण झाली होती, तिथेच राहतात.

सुदर्शनने पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे पोलिसांनी अनुष (वय-23), ताजुद्दीन (वय-23) आणि सुब्रमणी(वय-20) या तिघांना अटक केली आहे. घटना घडली त्या दिवशी हे तिघेही जण दारू प्यायलेले होते असं पोलिसांनीही म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या