खरा हिंदुस्थानी कोण हे न्यायाधीश ठरवू शकत नाहीत! सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर प्रियांका गांधी यांची प्रतिक्रिया

खरा हिंदुस्थानी कोण आहे आणि कोण नाही हे ठरविण्याचे काम न्यायव्यवस्थेचे किंवा कुणा न्यायाधीशाचे नाही,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवर दिली आहे.

चीनने हिंदुस्थानची जमीन बळकावल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी भारत यात्रेच्या दरम्यान केले होते. त्यावरून त्यांच्या विरोधात सैन्याच्या मानहानीचा दावा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी हा दावा फेटाळताना राहुल गांधी यांना सुनावले. ’चीनने जमीन हडपल्याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्ही कधी तिथे गेला होता का? जो सच्चा हिंदुस्थानी आहे, तो असे बोलणार नाही,’ असे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाच्या या टिप्पणीवर प्रियांका गांधी आज बोलल्या. ‘न्यायव्यवस्थेचा पूर्ण सन्मान राखून मी हे बोलतेय की खरा हिंदुस्थानी कोण आहे आणि कोण नाही हे ठरविण्याचे काम न्यायाधीशांचे नाही. राहुल गांधी यांनी नेहमीच देशाच्या सैन्याचा आदर केला आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणात हा आदर स्पष्ट दिसतो,’ असे प्रियांका म्हणाल्या.

चीनच्या मुद्दय़ावरही चर्चा होऊ द्या!

‘कित्येक दिवसापासून संसद चालत नाहीये. इतके अवघड आहे का? सर्वांशी बोला. चर्चा मान्य करा. एखाद्या मुद्द्यावर चर्चा का होऊ शकत नाही. हा राष्ट्रव्यापी मुद्दा आहे. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली. मग चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावरही चर्चा करा. लोकांना कळू द्या. आम्ही आमची बाजू मांडतो, तुम्ही तुमची भूमिका मांडा. यात घाबरण्यासारखे काय आहे? संसद चालवू शकत नाहीत हे सरकारचे अपयश आहे, असा टोलाही प्रियांका गांधी यांनी हाणला.