हिंदुस्थान पाकिस्तानला मोफत कोविड प्रतिबंधक लस देणार? वाचा व्हायरल मेसेजमागील सत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान पाकिस्तानला कोरोना प्रतिबंधक लसीचे एक कोटी 46 डोस पुरवणार आहे. इतकेच नाही तर हिंदुस्थान पाकिस्तानला मोफत लस देणार असल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. या मेसेजमुळे अनेकांनी हिंदुस्थान सरकारची पाठ थोपटली आहे. तर काही जणांनी ट्रोल करून पाकिस्तानला लस देण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित केल आहे. पण हिंदुस्थान खरंच पाकिस्तानला मोफत लस पुरवठा करणार आहे का?

संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान अजूनही संपलेले नाही. अशा वेळेत कोरोना लस ही नवी आशा घेऊन आली आहे. हिंदुस्थानमध्ये कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या दोन लसींची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. अनेक गरीब देशांना जागतिक आरोग्य संघटना ही लस पुरवणार आहे. म्हणजेच ज्या देशांकडे लस घेण्यासाठी पैसे नाही, त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना पुढाकार घेणार आहे. या योजने अंतर्गत जगातील 92 देशांना जागतिक आरोग्य संघटना मोफत लस पुरवणार आहे.

या 92 देशांत पाकिस्तानचाही समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या योजनेला कोवॅक्स असे नाव दिले आहे.
कोवॅक्स अंतर्गत 2021 मध्ये ज्या देशांची अर्थव्यवस्था खालवलेली आहे किंवा मध्यम स्वरुपाची आहे अशा 92 देशांना जागतिक आरोग्य संघटना 130 कोटी लस पुरवणार आहे. श्रीमंत देश हवी ती किंमत देऊन लस विकत घेऊ शकतात. पण गरीब देशांना ही लस मिळण्यास उशीर होईल म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घेत गरीब देशांना लस पुरवण्याची जबादारी घेतली आहे.

या योजने अंतर्गत गरीब देशांना लस पुरवली जाणार असून सर्वपर्थम कोविड योद्ध्यांना ही लस पुरवली जाईल. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तर 60 वर्षापेक्षा कमी असलेले आणि ज्यांना गंभीर आजार आहेत अशा नागरिकांना ही कोरोनाची लस दिली जाईल.

कोवॅक्स अंतर्गत जागतिक आरोग्य संघटना कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती करणार्‍या कंपनीकडून लस विकत घेणार आणि लोकसंख्येनुसार त्या त्या देशात वितरित करणार.

म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना हिंदुस्थानकडून ही लस विकत घेऊन पाकिस्तानला मोफत देणार आहे. हिंदुस्थान पाकिस्तानला मोफत लस देणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे निष्पण्ण झाले आहे.