कोण आहे सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी कुमारी आंटी?

सोशल मीडियाच्या वापरातून दररोज नवनवीन व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. लोकांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी, निर्भीडपणे आपले विचार मांडण्यासाठी तसेच आपल्या व्यवसायाला प्रसिद्ध करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. त्यामुळे दररोज वेगवेगळे हॅशटॅग ट्रेंडिंगवर येतात. याद्वारे आपल्याला ट्रेंड होणाऱ्या व्यवसायाची, व्य़क्तींची माहिती मिळते. असाच एक ‘कुमारी आंटी’ (Kumari Aunty) नावाचा हॅशटॅग सोशल मीडिया साइट X वर सध्या  ट्रेंड करत आहे. या हॅशटॅगसह आतापर्यंत अनेक पोस्ट करण्यात आल्या आहेत. हा हॅशटॅग पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की ‘कुमारी आंटी’ आहे तरी कोण?

कोण आहेत ‘कुमारी आंटी’ ?  

कुमारी आंटी या हैदराबादमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्या ITC कोहिनूर मधील इनऑर्बिट मॉलसमोर त्यांचा रस्त्याच्या कडेला स्टॉल आहे. कुमारी आंटी खाद्यपदार्थ विकतात. त्यांचे जेवण भलतेच स्वादीष्ट असते असे अनेकांचे म्हणणे आहे. यामुळे त्यांच्या स्टॉलवर दिवसभर लोकांची गर्दी असते. एवढेच नव्हे तर या आंटीच्या स्टॉलवर चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सेलिब्रिटी देखील येतात. आपल्या व्यवसायातून आंटी दररोज 30 हजारांची कमाई करतात.

कुमारी आंटीच्या स्टॉलवर लोकांना भात, चिकन आणि मटण यांचे वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. त्यामुळे ासपासच्या परिसरातून शेकडो लोकं त्यांच्या स्टॉलवर रोज जेवायला येत असतात. साहजिकच आहे यामुळे या परिसरात प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे काहींनी या स्टॉलविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कुमारी आंटीचा स्टॉल हटवला आणि तिचे साहित्य जप्त केले. कुमारी आंटीचे म्हणणे आहे की या कारवाईमुळे तिचे 50 हजार रुपयांचे अन्न वाया गेले. कुमारी आंटीने आरोप केला आहे की तिच्याकडे काम करणाऱ्यांना पोलिसांनी मारहाणही केली.

कुमारी आंटीच्या स्टॉलविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईनंतर अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी व्हिडीओ तयार करत निषेध केला. त्यांनी कुमारी आंटीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात सुरूवात केली. मध्यमांनीही हे प्रकरण लावून धरल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनीथेट पोलीस महासंचालकांना फोन फिरवत कुमारी आंटीला पुन्हा स्टॉल सुरू करू द्या असे आदेश दिले. याशिवाय कुमारी आंटी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हेही मागे घ्यावेत असे आदेश दिले. रेवंथ रेड्डी यांनी स्वत: देखील कुमारी आंटींच्या स्टॉलला भेट देणार असल्याचे सांगितले आहे. रेड्डी यांच्या या निर्णयामुळे कुमारी आंटी आणि त्यांचे ग्राहक खूप खूश झाले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे कुमारी आंटी हा हॅशटॅग ट्रेडींगमध्ये आला आहे.