कोरोनावर प्रभावी उपाय सापडणे कठीण; जागतिक आरोग्य संघटनेचा धोक्याचा इशारा

960

कोरोनाने पूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोनावर औषधे आणि लस शोधण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. काही देशांची कोरोनाची लस आणण्याचे प्रयत्न अंतीम टप्प्यात आले आहेत. या महिन्याच्या अखेरीत कोरोनाची लस बाजारात येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेने ( डब्लूएचओ) धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाची लस बाजारात आल्यानंतरही कोरोनावर ठोस आणि प्रभावी उपाय सापडणे कठीण असल्याचा इशारा आरोग्य संघटनेने दिला आहे. तसेच जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठीही खूप वेळ लागणार असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

जगभरात सध्या 1.81 कोटी रुग्ण कोरोनाबाधित असून 6.88 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता डब्लूएचओचे महासंचालक टेड्रॉस अॅधनोम घेब्रेयसस आणि संघटनेचे आपत्कालीन प्रमुख माइक रयान यांनी सर्व देशांना कोरोना प्रतिबंधक उपायांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. अजूनही काही देश मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग, हाथांची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता यांचे योग्य पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचा फेलाव रोखण्यासाठी सर्वच देशांनी प्रतिबंधक उपाययोजनांचे सक्तीने पालन होण्यासाठी अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे.

कोरोनाच्या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. ही लस आल्यानंतर कोरोना संपुष्टात येईल आणि आपल्याला लोकांना संक्रमित होण्यापासून वाचवता येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, कोरोनाची लस आल्यानंतरही कोरोना रोखण्यासाठी ठोस उपाय सापडणे कठीण असल्याचा इशारा रयान यांनी दिला आहे. कदाचित आपल्याला आता कोरोनासोबत जगण्याची सवय करावी लागेल, असेही ते म्हणाले. सध्यातरी कोरोनावर कोणताही उपाय नसल्याने आपल्याला नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या