हा आवाज कुणाचा… शिवशक्तीचा!

शिवतीर्थावर रविवारी शिवशक्तीचं तुफान आलंगर्दीच्या लाटा उसळल्या. शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या अफाट उत्साहाचे दर्शन पावला पावलावर घडले. मुंबईतील सारे रस्ते जणू शिवतीर्थाकडे वळले होते. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून वाजतगाजत, गुलाल उधळत जल्लोष करत जथेच्या जथे दुपारपासूनच शिवतीर्थावर दाखल होत होते. भगव्या साडय़ा, भगव्या टोप्या, भगवी उपरणे, भगव्या टोप्या, भगवे झेंडेअवघे वातावरण भगवेमय झाले होते. मुंबईच्या रक्षणासाठी, मराठी एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी, ठाकरे बंधूंच्या शिवगर्जनेचे साक्षीदार होण्यासाठी ही शिवतीर्थाची वारी होती… 16 तारखेला विजयाचा गुलाल शिवशक्तीचाच असणार, हा नारा या ऐतिहासिक सभेने बुलंद केला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही नेत्यांची शिवतीर्थावर पार पडलेली ही पहिली अतिविराट सभा होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात अभूतपूर्व उत्साह संचारला होता. सभेची वेळ सायंकाळची होती. मात्र दुपारपासूनच दादर रेल्वे स्थानकापासून शिवतीर्थापर्यंतचे सर्वच रस्ते शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या गर्दीने फुलले होते. सत्ताधाऱ्यांच्या राक्षसी प्रवृत्तीपासून मुंबईला वाचवायचेच, या निर्धाराने शिवतीर्थावर जाण्यासाठी लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. यात जुन्याजाणत्या, निष्ठावंत, सच्चा ज्येष्ठ शिवसैनिकांपासून तरुण, महिला ते अगदी लहानग्या शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. शिवसेना-मनसेची युती झाल्याचा परमोच्च आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. जथेच्या जथे शिवतीर्थाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना वाटेत ‘शिवसेना भवन’जवळ आदराने झुकत होते. त्यामुळे ‘शिवसेना भवन’चा परिसर भगवामय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा पुतळा असून तेथेही माँसाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. परिसरात भगवे झेंडे डौलाने फडकत होते.