‘गणेश’ कर्जमुक्त म्हणता, तर 72 कोटी कशाचे मागता?

गणेश कारखाना कर्जमुक्त झाला आहे, असे माजी अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ म्हणत असतील तर मग प्रवरा कारखाना 72 कोटी रुपये कसले मागतो आहे? असा सवाल ‘गणेश’चे विद्यमान अध्यक्ष सुधीर लहारे यांनी माजी अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ यांना केला. दरम्यान, 72 कोटी रुपये द्या नाहीतर ‘गणेश’ची मालमत्ता तारण द्या, अशी मागणी त्यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. माजी अध्यक्षांना फक्त शिक्क्यांचा अधिकार होता, सह्यांचा नाही, त्यामुळे कदाचित या सगळ्या बाबी अवगत नसतील, असे लहारे यांनी सांगितले.

मुकुंदराव सदाफळ यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना सुधीर लहारे म्हणाले, त्यांनी संचालक मंडळावर केलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत. कोणताही साखर कारखाना वित्तीय संस्थांच्या सहकार्याने चालतो, गणेश चालवायला घेतला तेव्हासुद्धा प्रवरा कारखान्याने गणेश कारखाना गहाण ठेवून कर्ज काढलेले होते, याची कदाचित माजी अध्यक्षांना कल्पना नसेल. आज सहकार खात्याला खोटे पत्र देऊन ‘गणेश’ला वित्तीय पुरवठा होऊ नये, यासाठी मोठय़ा प्रमाणावर अडथळे निर्माण केले जात आहेत. गणेश कारखान्याच्या संचालक मंडळाने मांडलेली भूमिका ही व्यक्तिगत विरोधातून नाही, तर कामगार आणि सभासदांचे प्रपंच फुलावे यासाठी आहे.

लहारे म्हणाले, गेल्या दहा वर्षांत गणेश कारखान्याचा ज्या पद्धतीचा कारभार झाला त्याचे धिंडवडे आम्हाला वेशीवर टांगायला लावू नका. करार संपल्यानंतर मुकुंदराव सदाफळ यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन संचालक मंडळाच्या ताब्यात कारखाना देण्यात आला होता, त्या संचालक मंडळाने चांगले लक्ष दिले असते, रेकॉर्ड तपासून घेतले असते तर आज ज्या खोटय़ा रकमा दाखवून गणेश कारखान्याला हडपण्याचा प्रवरेचा जो डाव सुरू आहे तो झाला नसता. तत्कालीन संचालक मंडळाला आम्ही आवाहन करतो की, आपण दहशत झुगारून गणेश सहकारी साखर कारखान्याच्या चांगल्या भविष्यासाठी पाठीशी उभे राहा. जो भ्रष्ट कारभार गेल्या दहा वर्षांत झाला आहे, त्याचा भंडाफोड करण्यासाठी साक्षीदार व्हा, गणेश परिसर आपले हे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवेल.

हा छळकपट त्यांनाही मान्य नसेल

तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात गणेश कारखान्याचा तोटा 70 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. प्रवरा कारखान्याने आता 72 कोटी रुपयांची मागणी केली आहे. माजी अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. प्रवराच्या नेतृत्वाने चालवलेला छळकपट मनातून त्यांनाही मान्य नसेल. नेत्याची बाजू घेण्यापेक्षा दहशत झुगारून गणेश कारखान्याच्या भविष्यासाठी सत्य बोला, असे मत सुधीर लहारे यांनी मांडले.

शेतकरी, कामगार हा विधानसभेचा मतदार

प्रवरा सहकारी साखर कारखाना आणि त्यांच्या नेतृत्वाने हे लक्षात घ्यायला हवे की, गणेश कारखान्याचा सभासद, कामगार, शेतकरी हे विधानसभेचे मतदारसुद्धा आहेत. गणेश परिसरातील शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या अन्नात माती कालवणाचे पाप कोणीही करू नये; अन्यथा येत्या निवडणुकीत आम्ही सर्व हा छळकपट लक्षात ठेवू, असेही लहारे म्हणाले.