सिनेट निवडणुकीला स्थगिती का दिली?हायकोर्टाचा खडा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करणाऱ्या मिंधे सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात हात झटकले आणि स्थगितीचे खापर विद्यापीठावर फोडले. सिनेट निवडणूक स्थगित का केली, असा खडा सवाल न्यायालयाने करताच हादरलेल्या मिंधे सरकारने हा विद्यापीठाचा निर्णय असल्याचा युक्तिवाद केला. मात्र विद्यापीठाने आपण सरकारच्याच सांगण्यावरून निवडणूक पुढे ढकलल्याचे सांगितले. या ‘टोलवाटोलवी’ची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आणि सरकार व विद्यापीठाला प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला दिलेली स्थगिती नियमबाह्य असून आधी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच निवडणूक घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते ऍड. सागर देवरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. राजकुमार अवस्थी यांनी निवडणूक स्थगित करण्याच्या मिंधे सरकारच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला. निवडणुकीला दिलेली स्थगिती विद्यापीठाच्या नियमांशी विसंगत आहे. एकदा जाहीर केलेली निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय पूर्णपणे बेकायदा आहे, असा दावा ऍड. अवस्थी यांनी केला. त्याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली आणि सिनेट निवडणूक स्थगित का केली, असा खडा सवाल करीत विद्यापीठ व सरकारला प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार असून न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकार म्हणते…. 

सिनेट निवडणूक स्थगित करण्याच्या निर्णयामुळे मोठय़ा अडचणीत सापडलेल्या मिंधे सरकारची बाजू मांडण्यासाठी महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयात हजेरी लावली होती. सिनेट निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. ती तारीख आता उलटून गेली आहे. या निवडणुकीला सरकारने स्थगिती दिलेली नाही. निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाचा आहे, असे सराफ यांनी खंडपीठाला सांगितले.

विद्यापीठाचा दावा

सुनावणीवेळी मुंबई विद्यापीठातर्फे ऍड. युवराज नरवणकर यांनी युक्तिवाद केला. भाजप आमदार आशीष शेलार यांनी मतदार यादीत दुबार नावे असल्याचा आरोप केला. त्यानंतर सरकारने एका दिवसात मतदार यादीची छाननी करून निवडणूक पुढे ढकलण्यास सांगितले होते. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम 8(7) मधील तरतुदींच्या अनुषंगाने आम्ही सरकारच्या सूचनेचे पालन केले, असे विद्यापीठातर्फे ऍड. नरवणकर यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाने नेमली स्वतंत्र समिती

मतदारयादीतील कथित घोळ तसेच निवडणूक कार्यक्रमाबाबत निर्माण झालेला गुंता सोडवण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एक स्वतंत्र समिती नेमली आहे. या समितीची 28 सप्टेंबर रोजी बैठक होणार असून त्यात सिनेट निवडणुकीबाबत आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. त्यानंतर ही समिती 29 सप्टेंबरला आपला अहवाल सादर करेल, असेही विद्यापीठातर्फे खंडपीठाला सांगण्यात आले.