
निरोगी आणि आरोग्यदायी शरीरासाठी खाण्यापिण्याच्या सवयींप्रमाणेच पुरेशा झोपेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, कारण अपुऱ्या झोपेमुळे विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. याचा परिणाम दैनंदिन कामावर होतो. तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्तिंकडून नेहमीच ‘लवकर झोपे लवकर उठे तया आरोग्य, ज्ञान-संपदा मिळे’, हे वचन नेहमीच ऐकले असेल. या वचनाबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का, रात्री लवकर झोपणे का आवश्यक आहे ? जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर –
रात्री उशिरा झोपल्याने शरीराला अनेक तोटे होतात. उशिरा झोपल्यामुळे झोप पूर्ण होत नाही किंवा दुसऱ्या दिवशी उत्साही वाटत नाही. दिवसभर निरुत्साह, आळस, मरगळ येणे अशा प्रकारचे त्रास जाणवू लागतात. डोळे सुजलेले दिसतात. यामुळे चुकीच्या वेळी झोप येते. कोणतेही काम करावेसे वाटत नाही. चिडचिडेपणा जाणवण्याचीही शक्यता असते याशिवाय इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
- प्रत्येक व्यक्तीने रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत जेवणे आणि 10 वाजण्यापूर्वी झोपणे, या वेळा आदर्श आहेत. जाणून घेऊया, रात्री लवकर झोपण्याचे शरीराला होणारे फायदे.
- रात्री 10 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी झोपल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते. तणाव आणि चिंता यासारख्या मानसिक समस्यांना विनाकारण बळी पडावे लागत नाही.
- रात्री लवकर झोपल्याने पचनक्रियाही मजबूत राहते. आपण खातो ते सर्व अन्न सहज पचते आणि आपल्याला चांगली झोप लागते.
- रात्री 10 वाजण्यापूर्वी झोपल्याने चयापचय क्रिया चांगली राहते. खाल्लेल्या कॅलरी देखील जलद बर्न होऊ लागतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी म्हणजेच जास्त वजन आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
- लवकर झोपल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. पुरेशी झोप घेतल्याने चेहरा उत्साही आणि ताजातवाना दिसतो, तर उशिरा झोपल्यामुळे थकवा, आळस, निद्रानाश आणि चेहऱ्यावर सूज दिसून येते.

























































