सरकारी सुरक्षा घेण्यास ओवेसींचा नकार, अमित शाह यांना लिहिणार पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी संसदेत स्वत:वर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, ज्यांनी हा कट्टरपणा दाखवला, माझ्यावर हल्ला केला. त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल त्यांनी केंद्र रकारला केला आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, त्यांच्यावर चार राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. हे लोक इतके कट्टर कसे झाले? हे कोण लोक आहेत, ज्यांचा मतपत्रिकेवर नाही, तर गोळीबारावर अधिक विश्वास आहे. ही लोक आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाच्या विरोधात आहेत.

ते म्हणाले की, ”अंतर्गत सुरक्षा विभागात सर्व धर्माच्या लोकांचा एक सेल बनवावा”. ओवेसी पुढे म्हणाले की, ”जी चूक एनडीएने केली, तीच चूक तुम्हीही (मोदी सरकार) करत आहात. यामुळे देशाची शालीनता धोक्यात येईल आणि देशाचे नुकसान होईल.” ते म्हणाले, ”सोशल मीडियावर कुणी चुकीचं बोललं तर त्याच्यावर यूएपीए लादलं जातं, ज्यांनी हा कट्टरपणा दाखवला आहे, त्यांच्यावर यूएपीए का लादलं जात नाही”, असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारने दिलेली झेड श्रेणीची सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून दिल्लीत स्वत:साठी बुलेट प्रूफ वाहनाची मागणी करणार असल्याचेही ओवेसी म्हणाले आहेत. तसेच स्वतःच्या सुरक्षिततेसाठी शस्त्र ठेवण्याची परवानगी द्यावी, पण सरकारची सुरक्षा मी घेणार नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, असदुद्दीन ओवेसी हे उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारासाठी आले होते. गुरुवारी हापूर टोल प्लाझा येथे त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना यूपी पोलिसांनी गुरुवारीच अटक केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात आरोपी दिसत आहेत. दोन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.