मंगळसूत्र का घालावं…? महिलांचं काय आहे मत, वाचा….

2588
फोटो - प्रातिनिधिक

मंगळसूत्र… दोन जिवांना… दोन घरांना विवाह बंधनात जोडणारे काळे मणी… धार्मिक भाषेत सौभाग्य लेणं… सौभाग्यासोबत येणारी देखणी फॅशन…स्त्रीची  सुरक्षितता… जोडीदाराविषयीचा जिव्हाळा… कितीतरी गोष्टी या काळय़ा मण्यांभोवती गुंफल्या गेल्या आहेत. काळ बदलत जातोय… बऱ्याच जणी आधुनिकतेच्या नावाखाली स्त्री स्वातंत्र्याच्या विचाराने  मंगळसूत्र घालत नाहीत… काहींना फॅशन म्हणून आवडते, काही जणी सुरक्षितता म्हणून कायम गळय़ात ठेवतात. एक ना दोन अनेक गोष्टी. खरोखर काय आहे, आजच्या स्त्रीच्या दृष्टीने… मंगळसूत्राचे महत्त्व…?

घालायला आवडतेनेहा फणसे, माहीम

neha-fanse

आपल्या हिंदू संस्कृतीत मंगळसूत्र एक पवित्र नातं, नवऱ्यावरील प्रेम, त्यामागच्या भावना आणि कुठेतरी मर्यादा यासाठी ते घातले जाते. मी कधीच फॅशन म्हणून मंगळसूत्र घालत नाही. मला मंगळसूत्राची आवड आहे. आज महिलांना सुरक्षेची खरोखरच गरज आहे. नुकतेच माझ्या ओळखीत दोन केसेस झाल्या. नवरा वारल्यानंतर त्यांना मंगळसूत्र घालायचे नव्हते, पण त्यांना ते घालावे लागले. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने शंभर टक्के मंगळसूत्र घालायला हवे.  जेव्हा मुलीच्या गळय़ात मंगलसूत्र येतं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येतं. प्रत्येक स्त्रीच्या दृष्टीने मंगळसूत्र फार महत्त्वाचे आहे. तसेच नवऱ्याविषयीचे प्रेमही आहे. मला हे खूप पवित्र बंधन वाटतं.त्यामुळे मंगळसूत्र घालायला आवडते. मी नेहमीच्या वापरासाठी लहान मंगळसूत्र वापरते, पण सण-उत्सवांना मी आवर्जून मोठे मंगळसूत्र घालते. प्रत्येकीने ते घालावे. हल्ली अनेक स्त्र्ाया वेस्टर्न कपडय़ांवर मंगळसूत्र घालायला टाळतात, पण त्यावरही शोभेल अशी मंगळसूत्र आहेत तशा पद्धतीची घालायला हरकत नाही. बाईचे सौंदर्य मंगळसूत्रातच चांगले वाटते ते घालायलाच हवे.

जोडीदारावरच्या प्रेमासाठी अनुश्री बर्वे, डोंबिवली

anushree-barve

मी असे म्हणेन की, आपल्या जोडीदारावरचे प्रेम म्हणून मंगळसूत्र घालावे. मी तरी माझ्या जोडीदारावरचे प्रेम व्यक्त करणारे माद्यम म्हणून मंगळसूत्र घालते. त्याच्या बरोबरीने फॅशन पण होते आणि सुरक्षितता पण मिळते. आपली संस्कृती आहे ती जपायलाच हवी. जर एखाद्या कंपनीमध्ये नियमच असेल की तुम्हाला काहीच घालायचे नाही किंवा काही प्रोफेशनमध्ये तर तिकडे तुम्ही तेवढय़ापुरताच घालू नका. उगाचच बंडखोरी करायची आणि नाही आवडत म्हणून जर टाळायचे असेल तर ती गोष्ट चुकीची आहे. पण माझे म्हणणे आहे की स्त्र्ायांप्रमाणे पुरुषांनाही विवाहीत असल्याचे काही तरी असावे. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांवर रोख येईल. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार मंगळसूत्र घालायला हरकत नाही. कॉर्पोरेट क्षेत्रात मंगळसूत्र घालू नये असा कोणी नियम केलेला नाही. तुमचं प्रोफेशन तसं असेल तर ते तेवढय़ापुरता घालू नका, पण एरव्ही ते घालायला हरकत नाही. मी फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे व्यायाम करताना, शिकवताना मंगळसूत्राचा अडथळा येतो. ते अडकण्याची, तुटण्याची शक्यता असते अशा वेळी काढून ठेवते आणि नंतर ते घालते.

सण-उत्सवांना आवर्जून घालते – अमृता नाईक, बोरिवली

amruta-naik

मंगळसूत्र एक पवित्र बंधन आहे, त्याचं प्रतीक म्हणून घालते. बघितले गेले तर काळे मणी हे शिवाचे प्रतीक आणि सोने शक्तीचे रूप असे बोलले जाते. लग्नाच्या वेळी जे मंत्रोपचार करून त्यावर सोपस्कार केले जातात ते खरे मंगळसूत्र. आज अनेक मुली फॅशन म्हणून मंगळसूत्र घालतात.  मंगळसूत्रामुळे त्या स्त्रीला एक सुरक्षितता येते. तिच्याकडे अन्य पुरुषाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आज अनेक विधवा महिलाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी मंगळसूत्र घालतात. आपण काळानुसार बदलायला हवे, पण आपली संस्कृतीही जपायला हवी. आज अनेक जणी मंगळसूत्र म्हणून ब्रेसलेट घालतात. मंगळसूत्र हे हातात घालण्यासाठी नाहीच आहे. त्याचे पावित्र्य हे गळय़ात घातल्यावरच आहे.. मीही आताच्या जनरेशनचीच आहे. मी कायमच मंगळसूत्र घालते असे नाही. पण सणावार, उत्सव, धार्मिक कार्य अशा वेळी आवर्जून मंगळसूत्र घालते. कारण तो सौभाग्य अलंकार आहे. आताचा काळ वेगळा आहे. त्यामुळे मंगलसूत्र गळय़ात असले की आपण सुरक्षित असतो. बाईच्या गळय़ाला मंगलसूत्राने शोभा येते जी नुसती चैन घातल्यावर येत नाही. रोज घाला असे नाही, पण घालायच्या ठिकाणी घालायलाच हवे.

सुरक्षिततेसाठी मोहिनी दातार, ठाणे

mohini-datar

मंगळसूत्र हा महिलांच्या जिव्हाळय़ाचा विषय आहे. तसा खूप खोल गहन आहे. कधी फॅशन तर कधी सुरक्षितता, तर कधी नवऱ्यावरील प्रेम, पण मी मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त विचार करते. कोणी ते कसे घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला मंगळसूत्र हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटते. मंगळसूत्र गळय़ात असल्यावर प्रेम, आपुलकी यापेक्षा कोणी तरी आहे ही भावना जास्त सुरक्षित करते. मंगळसूत्र घातलेल्या स्त्रीच्या मागे एक खंबीर साथ आहे अशी समाजाची मानसिकता असते. पण एक नक्की आहे की, मंगळसूत्र आधार असला तरी प्रत्येक स्त्राrने आजच्या जमान्यात स्वसंरक्षणासाठी सक्षम असायला हवे असं मला वाटत. हल्ली फॅशन म्हणून मंगळसूत्र गळ्यात न घालण्याची प्रथा आहे, मात्र ती योग्य आहे असे वाटत नाही. स्वत;तील मांगल्य अणि पारंपरिकता जपण्याचा हा एक मार्ग आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या