
पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पहलगामच्या हल्ल्यात कुंकू पुसले गेलेल्या ऐशन्या द्विवेदी यांनी सरकार व बीसीसीआयवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘तुमच्या भावना मेल्या आहेत का? सैनिकांच्या आणि नागरिकांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही का?’ असा सवाल त्यांनी आज केला. ‘देशातील लोकांनी या सामन्यावर बहिष्कार टाकावा, मॅच बघू नये, असे आवाहन त्यांनी केले.
ऐशन्या यांचे पती शुभम द्विवेदी हे पहलगाम हल्ल्यात मारले गेले होते. क्रिकेट सामन्याविषयी कळताच त्यांनी एएनआयशी बोलताना आपली वेदना बोलून दाखवली. ‘बीसीसीआय व सरकारने पाकशी सामना खेळण्यास होकार दिलाच कसा? त्यांच्या भावना मेल्या आहेत का? तुमच्या घरातील कोणी गेले नाही म्हणून तुम्हाला दुसऱयाच्या दुःखाची किंमत वाटत नाही का, असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.
सामन्याचा प्रचार-प्रसार करणाऱयांवरही त्यांनी हल्ला चढवला. या लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? देशाप्रति तुम्हाला काहीच वाटत नाही का? आपल्या शेजाऱ्याशी भांडण झालं तर आपण त्याच्याशी अनेक दिवस बोलत नाही. इथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी तुमच्या देशात येऊन हिंदू म्हणून तुम्हाला गोळय़ा घातल्या. तुम्ही त्यांच्यासोबत खेळणार, तुमच्यात थोडीतरी माणुसकी शिल्लक आहे का, असा संतप्त सवाल ऐशन्या द्विवेदी यांनी केला.
कुठे आहेत क्रिकेटपटू?
हॉकी हा राष्ट्रीय खेळ असतानाही आज क्रिकेटला महत्त्व आहे. आपले क्रिकेटपटू राष्ट्रवादाचे प्रतीक झाले आहेत. हे क्रिकेटपटू आता कुठे झोपले आहेत? एखाद्दुसरा अपवाद वगळता कोणीही बोलण्याची हिंमत दाखवली नाही. ते भूमिका का घेऊ शकत नाहीत? त्यांनी भूमिका घेतली तर बीसीसीआय जबरदस्ती करू शकणार नाही, पण तेही काही बोलत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रायोजकांवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शेवटी हे सगळे पैशासाठी सुरू आहे आणि हा पैसा पाकिस्तान पुन्हा दहशतवादासाठी वापरणार हे उघड आहे. तरीही तुम्ही त्यांना आर्थिक ताकद देत आहात. पाकिस्तान दहशतवादी देश आहे. तुम्ही त्यांना कमाई करून द्याल आणि त्याच कमाईतून ते पुन्हा आपल्यावरच हल्ला करतील.