Crime News – पतीचा खून केला आणि मुलांना घेऊन रात्रभर मृतदेहा शेजारी झोपली; पत्नीसह तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिपलोती कला गावातील मेराज हा गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र, त्याची पत्नी रुहीचे तिच्या मेव्हण्याच्या भावाशी प्रेमसंबंध होते. मेराजला या गोष्टीची माहिती मिळाली आणि त्याने विरोध केला, ज्याचा राग धरून रुहीने त्याला आपल्या वाटेतून कायमचं हटवण्याचा कट रचला.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात सदर घटना घडली आहे. हत्येच्या रात्री रुहीने मेराजच्या जेवणातून गुंगीचे औषध दिले. तो बेशुद्ध पडल्यानंतर तिने प्रियकर फरमान आणि त्याचा मित्र अदनान यांना घरी बोलावले. या तिघांनी मिळून मेराजचे हात-पाय बांधले आणि धारदार शस्त्राने गळा चिरून त्याची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पतीची हत्या केल्यानंतर रुही रात्रभर आपल्या दोन लहान मुलांसह त्याच मृतदेहाशेजारी शांतपणे झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी मेराजच्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मुलगा दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला.

सुरुवातीला रुहीने चोरी आणि मारहाणीचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेराजच्या वडिलांनी संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच रुहीने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी रुहीसह तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली असून त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेले चाकू जप्त केले आहेत. सध्या या तिन्ही आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.