पत्नीपीडित पुरुष आश्रमात शीर्षासन करून ‘जागतिक पुरुष दिन’ साजरा

पत्नीपीडित पुरुष आश्रमात शीर्षासन करून ‘जागतिक पुरुष दिन’ (International Mens Day) साजरा करण्यात आला. महिला दिनाप्रमाणे पुरुष दिन साजरा करून त्यांना देखील त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत अशी मागणी संस्थापक अध्यक्ष भरत फुलारे यांनी केली. पुरुषांच्या तक्रारींकडं नेहमीच कानाडोळा केला जातो, तर दुसरीकडं महिलांनी दिलेल्या तक्रारीवर तातडीने कारवाई केली जाते. त्यांनी दिलेल्या खोट्या तक्रारींचं प्रमाण वाढलं आहे. आपली अडचण सांगू न शकणारे पुरुष आत्महत्येचं पाऊल उचलत आहेत. ज्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 2022 पासून 2025 पर्यंत 1 लाखाहून अधिक पुरुषांनी कौटुंबिक कलहातून आपलं जीवन संपवण्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळं पुरुषांसाठी देखील कायदे करण्याची मागणी संस्थापक अध्यक्ष भरत फुलारे यांनी केली आहे.

शीर्षासन आंदोलन करून निषेध

वाळूज परिसरात असलेल्या पत्नीपीडित पुरुष आश्रमात संघटनेच्या वतीनं शीर्षासन आंदोलन करुन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. पुरुषांवरील अन्याय वाढत चालले आहेत, त्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोहचवून देखील त्याबाबत विचार केला जात नाही. अनेकवेळा आंदोलन करुन, निवेदन देऊनही फायदा होत नसल्यानं पुरुषांवर गप्प बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळं शीर्षासन करून आंदोलन करत असल्याचं पत्नीपीडित पुरुष संघटनेचे अध्यक्ष भरत फुलारे यांनी सांगितलं.

देशात पुरुष आत्महत्या वाढल्या

महिलांच्या संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे अंमलात आणण्यात आले आहेत. त्यामुळं अनेक पीडित महिलांना त्याचा फायदा झाला आहे. एकीकडं ही सकारात्मक असलेली बाब असली तरी दुसरीकडं त्याच कायद्याचा गैरफायदा उचलण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली. लग्न झाल्यावर पती आणि त्याच्या कुटुंबीयांना पैशासाठी त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करुन सासरच्या मंडळींना कायद्याच्या चौकटीत अडकवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून पुरुषांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. 1966 ते 2021 पर्यंत पुरुषांचं आत्महत्येचं प्रमाण 3.3 टक्के इतके होतं, ते वाढून आता 12.4 टक्के इतकं झालं आहे. 2022 ते आजपर्यंत कौटुंबिक कलहातून 1 लाख 18 हजार 979 पुरुषांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. सर्वत्र होणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये 72.73 टक्के आत्महत्या पुरुषांच्या, तर 27 ते 28 आत्महत्या महिलांच्या आहेत. त्यांच्यामुळं पुरुषांच्या समोर असलेल्या समस्या जाणून घेण्याची गरज असल्याचं मत भरत फुलारे यांनी व्यक्त केलं.

पत्नी पीडित संघटना करत आहेत पुरुषांसाठी काम : एक काळ होता ज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना चिंतेचा विषय होता. त्यामुळं त्यांच्या संरक्षणासाठी कायदे करणं गरजेचं होतं, आजही त्या कायद्यांचा धाक असल्यानं अनेक महिलांना त्यांचं संरक्षण मिळतं यात शंका नाही. मात्र कायद्याचा धाक सर्वांनाच असणं आवश्यक असल्याचं मत भरत फुलारे यांनी व्यक्त केलं. व्यभिचाराचं कलम 497 रद्द झाल्यानं महिला उघडपणे अनैतिक संबंध करण्याकडं सरसावत आहेत. महिलांच्या खोट्या तक्रारींमुळं अनेक पुरुषांचे आयुष्य अडचणीत आले आहे. त्यात नुसता तिचा पती नसतो तर त्याचं अख्ख कुटुंब ओढलं जातं. अशा महिलांच्या विरोधात येऊन पुरुषांच्या हक्कासाठी पत्नी पीडित पुरुष आश्रम 2014 पासून उघडपणे काम करत आहे. भारतातून 11 हजार 763 पुरुषांनी सदस्य म्हणून नोंदणी केली आहे. महिलांना ज्याप्रमाणे कायद्याचं संरक्षण आहे. तसंच संरक्षण पुरुषांना देण्याची गरज असल्यानं हा लढा लढत असल्याचं भरत फुलारे यांनी सांगितलं.

‘या’ आहेत पत्नीपिडित पुरुष संघटनेच्या मागण्या

घरात लग्न करून आणलेली पत्नी छळ करते ही गोष्ट बाहेर सांगितल्यावर समाजात नाचक्की होईल, लोक नावं ठेवतील अशा भीतीनं अनेक पुरुष आपली तक्रार सांगण्यास समोर येत नाहीत. आपली व्यथा कोणाला सांगावी हे कळत नाही, मनाची घालमेल होते. त्यातूनच पुरुष आत्महत्या करत आहेत. संघटनेच्यावतीनं महिलांप्रमाणे पुरुषांसाठी संरक्षण कायदे करावेत. महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग स्थापन करावे. प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे. महिलेने केलेले आरोप सिद्ध झाल्यास पुरुषांना शिक्षा करा, पण आरोप खोटे निघाल्यास सदरील महिलेला शिक्षा करावी. खोट्या आरोपांमध्ये जेलमध्ये असलेला पुरुष बाहेर आल्यावर त्याला काम मिळत नाही. त्यामुळं त्याला आर्थिक मदत देण्याची तरतूद असावी, यासह अशा अन्य मागण्या सरकारकडं केल्याची माहिती भरत फुलारे यांनी दिली.