पत्नीचा खून, दगड बांधून मृतदेह तलावात फेकला पारनेरमधील धक्कादायक घटना, पतीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

चारित्र्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या पत्नीचा मृतदेह पतीने पोटाला दगड बांधून तलावात फेकल्याची घटना पारनेर तालुक्यातील वाघवाडी (ढवळपुरी) येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नंदा पोपट जाधव असे मृत महिलेचे नाव असून, पोपट जाधव असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. चार वर्षांपूर्वी नंदाचे लग्न पोपट जाधव याच्याशी झाले होते. मूळ राहुरी तालुक्यातील असलेला पोपट काही महिन्यांपूर्वी वाघवाडी येथे वाट्याने शेती करण्यासाठी पत्नीसह आला होता. लग्नानंतर चार वर्षे होऊनही अपत्य होत नसल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते. पाच महिन्यांपूर्वी नंदाला गर्भधारणा झाली. त्यानंतर पोपट तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तो तिला वारंवार मारहाण करीत होता. 29 मार्च रोजी रात्री त्याने नंदाला मारहाण केली. पहाटे सहा वाजेच्या सुमारास ती न उठल्याने त्याने तिच्या तोंडावर पाणी टाकले. मात्र, काहीही हालचाल न झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोपटच्या लक्षात आले. त्यानंतर दुचाकीवरून मृतदेह घेऊन तो तलावापर्यंत गेला. तेथे पोटाला दगड बांधून त्याने मृतदेह पाण्यात टाकून दिला.

रविवारी परिसरातील एक तरुण शेतकरी तलावातील पाण्याची पातळी पाहात असताना तलावात काहीतरी तरंगत असल्याचे त्याच्या लक्षात आले. मृतदेह पाण्यात टाकल्यानंतर शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा केल्याने पाण्याची पातळीही कमी झाली होती. तरुणाने काठीच्या मदतीने मृतदेह हलवून पाहिला असता तो महिलेचा असल्याचे त्याच्या लक्षात आले. पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

पोपटने पत्नीचा मृतदेह तलावात टाकल्यानंतर ती बेपत्ता झाल्याचा बनाव केला होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी पोपटचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. त्याच्या मूळ गावी तो पोलिसांच्या तावडीत सापडला. चौकशी सुरू केल्यानंतर तो काहीही माहिती देत नव्हता. त्याला घटनास्थळावर नेण्यात आले. तेथून पारनेर येथे आणण्यात आल्यानंतर त्याला पत्नीचा मृतदेह तसेच तिच्या पोटातील गर्भाची छायाचित्रे दाखविण्यात आल्यानंतर त्याने गुह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप तपास करीत आहेत.