सेक्सला नकार देण्याच्या पत्नीच्या अधिकारावर गदा का आणायची? दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर सेक्स वर्कर सेक्सला नकार देऊ शकते, तर मग पत्नी आपल्या पतीला सेक्सच्या बाबतीत ‘नाही’ का म्हणू शकत नाही? पत्नीला सेक्स वर्करपेक्षा कमी अधिकार आहे का? सेक्सला नकार देण्याच्या तिच्या अधिकारावर गदा का आणायची, असे महत्त्वपूर्ण प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने उपस्थित केले आहेत.

वैवाहिक बलात्काराशी संबंधित याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती राजीव शकधर आणि न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण मते नोंदवली. सेक्स वर्कर्सनाही आपल्या ग्राहकांना ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार आहे. जेव्हा पतीचा विषय येतो, तेव्हा पत्नीला या अधिकारापासून वंचित कसे ठेवले जाऊ शकते, असा सवाल न्यायमूर्ती शकधर यांनी उपस्थित केला. या वेळी न्यायालयाने नियुक्त केलेले ऍमिकस क्युरी आणि ज्येष्ठ वकील राजशेखर राव यांनीही युक्तिवाद केला. जर कुणा महिलेवर जबरदस्ती केली जात असेल तर अशा प्रकरणांत, किंबहुना सेक्स वर्कर महिलेलाही त्या व्यक्तीविरुद्ध आरोप करण्याचा अधिकार आहे, असे राव म्हणाले. या वेळी न्यायमूर्ती हरी शंकर यांनी वैवाहिक संबंधांमध्ये सेक्सची अपेक्षा सेक्स वर्करसारखी नसते, असे मत व्यक्त केले.

बलात्काराच्या कलमातील तरतुदीवर जोरदार चर्चा

सुनावणी वेळी भादंवि कलम 375 (बलात्कार) मधील तरतुदीवर जोरदार चर्चा झाली. या कलमावर न्यायमूर्ती हरी शंकर यांनी मांडली. बलात्काराला दंडनीय गुन्हा ठरवला जाऊ नये असे या कलमामध्ये म्हटलेले नाही. संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवण्याच्या कृत्यांपासून महिलांना संरक्षण देणे हा या कलमाचा मूळ हेतू आहे. त्यामुळे विवाहित महिलेला विनासहमती केलेल्या लैंगिक संबंधामध्ये संरक्षण नाकारू शकत नाही, असे न्यायमूर्ती शंकर म्हणाले.