
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत डिझेल 2.50 रुपयांनी स्वस्त केले, परंतु अवघ्या दहा दिवसांतच डिझेल 2.51 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सरकारने डिझेल कसले स्वस्त केले? ही तर क्रूर चेष्टा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेमध्ये उमटत आहेत. दरम्यान, डिझेलचे दर 79 रुपयांवर गेल्यामुळे जनतेवर आता कर्ज घेऊन गाडय़ांमध्ये डिझेल भरण्याची वेळ आली आहे. 4 ऑक्टोंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये अडिच रुपयांनी केंद्र सरकारने कपात केली. राज्यांनीही 2.50 रुपयांनी इंधन कपात करावी, अशी सूचना केली होती. महाराष्ट्रासह बहुतांशी राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट अडिच रुपयांनी कमी केला; पण डिझेलवरील व्हॅट कमी केलेला नाही. त्यामुळे पेट्रोल 5 रुपये तर अडीच रुपयांनी स्वस्त झाले.
रोजच दरवाढ
4 ऑक्टोबरनंतर दहा दिवसांत पेट्रोल प्रतिलिटर 1.22 रुपये तर, डिझेल तब्बल 2.51 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जेवढा दर कमी केला तेवढी डिझेलची दरवाढ अवघ्या 10 दिवसांत झाली आहे. दरकपातीचा आनंद 10 दिवसही जनतेला मिळाला नाही. सोमवारी डिझेल 8 पैशांनी महागले तर मुंबईत डिझेल 79.11 रुपये लिटरवर गेले आहे तर पेट्रोल 88.11 रुपये आहे.
तामीळनाडूत ‘स्मायलेज’ योजना
तामीळनाडूत एका खासगी बँकेने चक्क डिझेल खरेदीसाठी ‘स्मायलेज’ कर्ज योजना जाहीर केली आहे. तिरुप्पूर येथे सध्या प्रायोगिक तत्वावर योजना सुरू आहे. डिझेलसाठी जर 100 रुपयांचे कर्ज घेतले तर त्यावर 1.50 रुपये व्याज आकारले जाणार आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर सध्या ही योजना सुरू आहे. मालवाहतुकीसाठी एका राज्यातून दुसऱया राज्यात जावे लागते. त्यासाठी हजारो लिटर डिझेलचा वापर होतो. मालवाहतूकदारांकडून या कर्ज योजनेला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज आहे.
























































