ग्रेग चॅपेल यांनी टीम इंडियात दुहीची बीजे पेरली, व्हीव्हीएस लक्ष्मणचा चॅपेल यांच्यावर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी हिंदुस्थानी क्रिकेट प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना आंतरराष्ट्रीय संघ कसा तयार करायचा याचे ज्ञानच नव्हते. आपल्या अडेलतट्टू स्वभावाला साजेसे वर्तन त्यांनी प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत केले आणि टीम इंडियात दुहीची बीजे पेरली, असा गंभीर आरोप हिंदुस्थानचा माजी महान फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने आपल्या आत्मकथापर पुस्तकात केला आहे.
आपल्या ‘281 एंड बियोंड’ या आत्मकथेत लक्ष्मणने वरील टीकाटिप्पणी केली आहे.

लक्ष्मणच्या आत्मकथापर पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यात त्याने असा खळबळजनक खुलासा केला आहे की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत टीम इंडिया दोन गटांत दुभंगली गेली होती. त्यातला एक गट होता चॅपेल यांच्या आवडत्या खेळाडूंचा तर दुसरा होता त्यांच्या नावडत्या क्रिकेटपटूंचा.

खेळाडू स्टार असतात याचा चॅपेल यांना विसर पडला होता
क्रिकेटच्या मैदानात खेळणारे खेळाडू हे स्टार असतात याचा बहुधा प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना विसर पडला होता असे सांगत लक्ष्मण आपल्या पुस्तकात म्हणतो, चॅपेल यांचा प्रशिक्षकपदाचा पूर्ण कार्यकाळ कडवटपणा आणि हटवादी निर्णयाने भरलेला होता. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाला चांगले यश लाभले हा भाग वेगळा, पण हिंदुस्थानी संघातील फुटीला त्यांनी खतपाणी घातले ही बाब मला तरी विसरता येणार नाही. माझ्या कारकीर्दीतील सर्वात वाईट काळ चॅपेल यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीतच मी अनुभवला, असेही लक्ष्मणने स्पष्ट केले आहे.

मी नेहमीच महान फलंदाज ग्रेग चॅपेल यांचा सन्मान करीत राहीन, पण टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द माझ्या दृष्टीने तरी वादग्रस्तच होती. त्यांच्यापूर्वीचे प्रशिक्षक जॉन राइट यांनी संघात निर्माण केलेला एकोपा चॅपेल यांनी मोडला हे मात्र मला विसरता येणार नाही.- व्हीव्हीएस लक्ष्मण