
सामना प्रतिनिधी । नवी मुंबई
सानपाडय़ात मुस्लिमांची संख्या कमी असूनही सेक्टर 8 येथे मशीद बांधण्यासाठी सिडकोने भूखंड मंजूर केला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत येथे मशीद बांधू देणार नाही, असा इशारा सानपाडा रहिवासी संघाने दिला असून मंगळवारी 27 नोव्हेंबर रोजी बंद पाळण्यात येणार आहे. तसेच महाआरती व सायन-पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलनदेखील होणार आहे.
सानपाडय़ात मुस्लिमांची संख्या एक टक्क्याहून कमी असतानाही सिडकोने भूखंड क्रमांक 17 ‘ए’ हा मशिदीकरिता मंजूर केला. त्याविरोधात अनेकदा आंदोलने करण्यात आली. स्थानिक रहिवाशांनी पोलीस ठाण्यात तक्रारही केली. 6 मार्च 2013 रोजी पाच हजार जणांचा मोर्चा सिडकोवर काढण्यात आला होता. तसेच 21 जुलै 2016 रोजी बंददेखील पुकारला. तरीही मशिदीसाठी मंजूर केलेला भूखंड रद्द झाला नाही. कोणत्याही परिस्थितीत मशीद उभारू देणार नाही, असा इशारा देत मंगळवार 27 नोव्हेंबर रोजी सानपाडय़ात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. तसेच महाआरती व आंदोलनदेखील करण्याचा इशारा आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी अध्यक्ष कैलास तेजाने, सरचिटणीस घनश्याम पाटील, उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, संतोष पचालग, महेश बनकर, रामचंद्र पाटील, सुनील गव्हाणे, संदेश चव्हाण, विसाजी लोके आदी उपस्थित होते.
स्थानिक नेत्यांची फूस
सिडकोच्या नगररचनेमध्ये सानपाड्यात कुठेही मशिदीसाठी राखीव भूखंड नव्हता. तरीदेखील काही स्थानिक नेते फूस लावून हा भूखंड आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रहिवासी महासंघाने केला आहे.


































































