नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना विजयी करा – रामशेठ ठाकूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

नरेंद्र मोदी हे तपस्वी आहेत. अशा तपस्वी माणसाला पंतप्रधान बनविण्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे या सभ्य माणसालाच पुन्हा एकदा विजयी करा, असे आवाहन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी जेएनपीटी टाऊनशिप येथिल शिवसेना-भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात केले. खासदार बारणे यांनी लोकसभेत चर्चेत भाग घेताना सर्वाधिक प्रश्न उपस्थित करून चार वेळा संसद रत्न हा पुरस्कार मिळविला हे खरे तर या मतदार संघातील लोकांचे भाग्य आहे. तर त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला सभेत बोलता देखिल येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

33 मावळ लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी जेएनपीटी मल्टीपर्पज हॉलमध्ये महायुतीचा मेळावा मंगळवार 02 रोजी आयोजित केला होता. या सभेला युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत बोलताना युतीचे उमेदवार बारणे यांनी विरोधी उमेदवार पार्थ पवार आणि पवार कुटूंबावर खरपूस टिका केली. या मतदार संघात राष्ट्रवादीने कोणते असे काम केले आहे, असा प्रश्न विचारून यांनी फक्त महाराष्ट्र लुटण्याचे काम केले आहे. समोरच्या उमेदवाराचा आणि त्यांच्या कुटूंबाचा इतिहास येथिल मतदारांना माहित असून त्यांच्या भूलथापांना व अमिषांना येथिल मतदार भूलणार नसल्याचे सांगितले. युतीच्या सरकारच्या काळात या मतदार संघात कोट्यावधी रूपयांची कामे झाली असून येथिल सर्वाधिक प्रश्न मार्गी लावले असल्याचे बारणे यांनी सांगितले.

या मेळाव्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख दत्ता दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष महेश बालदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर, माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवि भोईर, तालुका संघटक बी.एन. डाकी आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी केले.