
दोन वर्षांपूर्वी मास्टर लिस्टवरील संगणकीय सोडतीत पात्र ठरलेल्या अर्जदाराला ताबडतोब घर देण्याचे आदेश म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सोमवारी म्हाडा मुख्यालयात आयोजित लोकशाही दिनात दिले होते. अखेर मंगळवारी या विजेत्याला घराच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विजेत्याने म्हाडाचे आभार मानले आहेत.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारितील मास्टर लिस्टवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील नरेंद्र निगुडकर हे रहिवासी असून ते संक्रमण शिबिरातील घरात वास्तव्यास होते. 2024 मध्ये त्यांना मास्टर लिस्टवरील संगणकीय सोडतीत घराची लॉटरी लागली. त्यानुसार त्यांनी संक्रमण शिबिरातील घर म्हाडाकडे सुपूर्द केले, मात्र अॅण्टॉप हिल येथील घराचा ताबा त्यांना विकासकाकडून अद्याप मिळाला नसल्यामुळे त्यांनी लोकशाही दिनात अर्ज केला होता. याची गंभीर दखल घेत ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी या प्रकरणी चर्चा करण्यासाठी संबंधित विकासकाला तत्काळ म्हाडा कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच निगुडकर यांना घराचा ताबा मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी या विजेत्याला घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.