राज्यात थंडीचा जोर वाढणार, अनेक भागांत पावसाची शक्यता; ढगाळ वातावरण राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तरेकडे बर्फवृष्टी झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देशभरात काही राज्यांमध्ये बोचऱ्या थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. महाराष्ट्रातही अनेक भागांत आल्हाददायक वातावरण असून थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही ठिकाणी आज पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात उद्या दिवसभर ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. 

बंगालच्या उपसागारत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असला तरी महाराष्ट्रात अनेक भागांत केवळ ढगाळ वातावरण राहील. मात्र पारा घसरणार असल्याने कडक उन्हापासून थोडाफार दिलासा मिळू शकतो. मुंबई, पुण्यासह राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात अनेक भागांत गारवा आणि आल्हाददायक वातावरण आहे. मात्र मुंबईत पहाटे आणि रात्रीच्या सुमारास थोडाफार गारवा जाणवत आहे. दुपारी मात्र प्रचंड उकाडा जाणवत असून अंगातून अक्षरशः घामाच्या धारा वाहत असल्याचे चित्र आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथेही पाऊस पडू शकतो. तर आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि  त्रिपुरा या भागात थंडीचा जोर वाढू शकतो.