देशभरात थंडीचा कहर, दल लेक गोठले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर-पश्चिम दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीने कहर केला आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी दाट धुक्यामुळे सकाळी सव्वा सात ते सव्वा नऊच्या दरम्यानची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. श्रीनगरमध्ये थंडीने मागील अकरा वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. येथे पारा उणे 6.8 अंश सेल्सिअसवर असून दल तलावही पूर्णपणे गोठला आहे.

जम्मू कश्मीरमध्ये आज मंगळवारी पारा 4.1 डीग्री सेल्सियसपर्यंत घसरला. थंड वाऱयांमुळे येथीस तापमान चांगलेच घसरले असून अक्षरशः पाणीपुरवठा होणाऱया पाईपलाईनमधील पाणीही गोठले आहे. दिल्लीकर अद्यापही दाट धुक्यात हरवले असून येथील कमीतकमी तापमान 4.6 अंश सेल्सिअसवर आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱया थंड वाऱयामुळे तापमानात आणखी घट होणार आहे. झारखंडमध्येही गेल्या दोन दिवसांत थंडीमुळे 16 जणांचा बळी गेला असून येथील पारा शून्यावर पोहोचला आहे. मध्य प्रदेशातील 42 शहरांमधील थंडीने सर्व रेकॉर्ड मोडत 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद केली आहे. पुढील दोन दिवसांत रांचीसह अन्य प्रमुख शहरांत थंडी वाढण्याची चिन्हे आहेत.

पंजाबमध्ये 1.1 डिग्री तर उत्तर प्रदेशात शून्य तापमान
पंजाबमध्ये अद्याप थंडी आणि दाट धुके कायम आहे. स्थानिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरूवारपर्यंत तापमान थंड असेल. अमृतसरमध्ये 1.1 डिग्री तापमानाची नोंद झाली. उत्तर प्रदेशातही थंडीचा कहर सुरूच आहे. येथील मुझफ्फरनगरमध्ये 0.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाचे संचालक जे. पी. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार कमाल तापमान 25.4 असून वाराणसी, फैजाबाद, कानपूर, आग्रासह अनेक शहरात धुके कायम असणार आहे.