
शहरातील चौपाटय़ांवर थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी मंगळवारी रात्री घराबाहेर पडलेले मुंबईकर बुधवारी पहाटे थंडीने कुडकुडत घरी परतले. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शहर व उपनगरात थंडीचा कडाका वाढला असून पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बुधवारी पहाटे सांताक्रुझमध्ये चालू हंगामातील सर्वात कमी म्हणजेच 15 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंद झाले.
शहरात डिसेंबरच्या मध्यावर थंडीने शिरकाव केला, मात्र या थंडीने सरत्या वर्षात अधूनमधूनच हुडहुडी भरवली. त्यानंतर आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला या थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी रात्रीपासून शहरात थंड वारे वाहू लागले होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास थंडीची तीक्रता वाढली. त्यामुळे शहरासह उपनगरात ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटवण्यात आल्या. बुधवारी पहाटे कुलाब्यात सरासरीपेक्षा 2.3 अंशांनी कमी म्हणजेच 17 अंश, तर सांताक्रुझमध्ये सरासरीपेक्षा 2.1 अंशांनी कमी म्हणजेच 15 अंश इतके किमान तापमान नोंद झाले. या थंडीचा प्रभाव दिवसाही कायम राहिला होता. त्यामुळे कमाल तापमानात दोन अंशांची घट झाली.
उत्तर हिंदुस्थानात कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तरेकडील थंड वारे आता मुंबईच्या दिशेने वाहू लागले असल्यामुळे शहरात पुढील आठवडाभरात थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
























































