
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारने प्रभाग रचनेसंदर्भात अध्यादेश जारी केल्यानंतर पालिका कामाला लागली आहे. प्रभागांची संख्या 227 वरून 236 करण्यासंदर्भात लेखी सूचना पालिकेला आल्या आहेत. त्यामुळे आठवडाभरात प्रभाग रचनेचा मसुदा तयार होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्य मंत्रिमंडळाने 11 नोव्हेंबर रोजी मुंबईतील नगरसेवक प्रभागांची संख्या 227 वरून 236 करण्यास परवानगी दिली होती. याबाबतचा अध्यादेश गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. यानंतर आज निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेबाबत लेखी सूचना महापालिका प्रशासनाला पाठवल्या आहेत. ‘या सूचनांनुसार प्रभाग रचना करण्यात येणार असून आठवडाभरात प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे,’ अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेची मुदत 8 मार्च रोजी संपणार आहे. यापूर्वी नव्या नगरसेवकांसह महापौरांची निवड होणे गरजेचे आहे. यानुसार पालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होण्याची अपेक्षा आहे. पालिकेला वाढीव प्रभांगासह मसुदा तयार करून निवडणूक आयोगाला सादर करावा लागेल.
अशी होणार कार्यवाही
– पालिका 336 प्रभागानुसार सुधारित प्रभाग रचना तयार करून तो मसुदा राज्य निवडणुक आयोगाला सादर करेल.
– राज्य निवडणूक आयोग अभ्यास करून त्यात गरज वाटल्यास पालिकेला सुधारणा करावयाच्या सूचना करेल अथवा आहे तसा आराखडा स्वीकारेल.
– निवडणूक आयोगाने मसुदा स्वीकारल्यानंतर त्यावर सूचना व हरकती मागवण्यात येतील.
– अथवा सुधारित मसुदा आणि प्रभागांचे आरक्षण जाहीर करून एकत्रित सूचना व हरकती मागविण्यात येतील.
























































