
कोपरगावात एका शेतकऱ्यावर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण जिल्हा व तालुका वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तेव्हा वनविभागाने या जखमी व्यक्तीला तात्काळ वैद्यकिय आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वैराळ यांनी केली आहे.
अनिल तुकाराम खोडके (48) असे शेतकऱ्याचे नाव असून तालुक्यातील वेळापूर येथील रहिवासी आहेत. अनिल 19 मे रोजी सायंकाळी आपल्या शेतातून घरी परतत होते, त्यावेळी त्यांच्यावर मंडलीक वस्ती परिसरात पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केला त्यात त्यांचे डोळ्याला दुखापत झाली आहे. त्यांना तत्काळ जवळचे डॉ. दिघे यांच्याकडे नेण्यांत आले तेथून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यांत त्यांना 15 टाके पडले. एवढी मोठी घटना होऊनही वन विभागाचे अधिकारी व त्यांचे कर्मचारी वन हद्दीतून होत असलेल्या वाळू वाहतुकीची वाहने धरून त्यांच्याकडून चिरीमिरी गोळा करत आहे असा आरोप राजेंद्र वैराळ यांनी केला.
याप्रकरणी वनाधिकारी माने व सोनवणे यांच्याशी वैराळ यांनी संपर्क साधला. जखमी अनिल खोडके यांची परिस्थीती बेताची आहे तरी त्यांना तत्काल वैद्यकिय आर्थिक मदत द्यावी व तालुक्यातील बिबटे, लांडगे आदिं हिंस्र वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून शेतात रात्री-अपरात्री पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व लोकवस्तीत नागरिकांवर वन्यप्राण्यांचे होणारे हल्ले थांबवण्यासाठी धडक कारवाई करून त्याबाबतचा आराखडा तयार करावा असेही ते शेवटी म्हणाले.
























































