पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीस अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चिखली

पत्नीकडून होणारी मारहाण, मित्र मंडळींंमध्ये होणारी बदनामी या सगळ्याला कंटाळून एका पतीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरीतील चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीस पोलिसांनी अटक केली आहे. जय देवीदास तेलवाणी (वय २५, रा. श्री साई सोसायटी, घरकुल, मोरेवस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी तृप्ती जय तेलवाणी (वय २१) हिला अटक केली आहे.

कांचन देवीदास तेलवाणी (वय ४०, रा. काळेवाडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्च २०१८ ते १३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत फिर्यादी यांची सून तृप्ती हिने आपला पती जय यास घरगुती कारणावरून तसेच वारंवार पैशांची मागणी करीत छळ केला. पैसे न दिल्याने त्यास शिवीगाळ करीत मारहाण केली. स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत त्याचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच आपल्या पतीला कॅन्सर झाला आहे, अशा टिक टॉक व्हिडिओ बनवून तो त्याच्या मित्रमंडळींना दाखवत पतीची बदनामी केली. या त्रासाला कंटाळून जय यांनी आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत याबाबत अधिक तपास करीत आहेत.