सुनेच्या छळाला कंटाळून सासूची आत्महत्या, भिगवणमधील प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सासूकडून सुनेचा छळ केल्याबाबतचे अनेक प्रकार घडल्याचे निदर्शनास येतात. मात्र, इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये याउलट प्रकार घडला आहे. सुनेकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुनेसह तिची आई, मावशी यांच्यासह तीन महिला व एक चालक अशा चार जणांवर भिगवण पोलीस ठाण्यात विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मयत महिलेने लिहिलेली एक सुसाईट नोट देखील सापडली असून यातून हा प्रकार समोर आला आहे.

सुगंधा शिवाजी पवार (रा. साईनगर, वार्ड नं.2 भिगवण, ता. इंदापुर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सुगंधा शिवाजी पवार यांचा मागील पाच वर्षापासून वारंवार छळ करून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. सुनेच्या या छळाला कंटाळून 30 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. यानंतर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक आठवडाभर त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र त्यास यश आले नाही. सुगंधा यांचा मृत्यू झाला.

शिवाजी काशिनाथ पवार (वय 62, रा. साई नगर भिगवण वार्ड नं.02 ता. इंदापुर) या महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरुन सून स्वाती अतुल पवार (रा. साईनगर भिगवण वार्ड नं.2, ता. इंदापुर), मंगल पांडुरंग मासाळकर, संजना रामु धोत्रे (दोघी रा. भिंगर पाथर्डी रोड वडारवाडी, ता. पाथर्डी), एक वाहन चालक तसेच तीन अनोळखी महिला यांच्याविरूद्द भिगवण पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील पाच वर्षापासून सुगंधा पवार यांचा छळ केला जात होता. या घटनेतील आरोपी हे संगनमताने सुगंधा शिवाजी पवार हिला वेळोवेळी घालुनपाडुन बोलत होते. गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून वेळोवेळी मारहाण करत होते. आरोपींनी तिचे जगणे असह्य केले होते. या त्रासाला कंटाळून सुगंधा पवार हिने आत्महत्या केली आहे, अशी फिर्याद मयताच्या पतीने दिली आहे.

पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुभाष रूपनवर करीत आहेत.