
सामना प्रतिनिधी, नांदेड
चिमुकल्या दोन मुलीसह आईने कुंडलवाडी-धर्माबाद रस्त्यावरील बाभळी बंधारा पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी घेतल्याची घटना शनिवार २३ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. यातील एका तीन वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला असून, आई व अन्य एका मुलीचा शोध सुरू आहे.
कुंडलवाडी शहरातील नईआबादी येथील यादव कांबळे यांच्या पत्नी पूजा यादव कांबळे (२६) यांनी आज दुपारी एकच्या सुमारास त्यांची मुलगी शिवानी कांबळे (५) व सुविद्या कांबळे (३) यांना घेवून कुंडलवाडी-धर्माबाद रोडवरील बाभळी बंधारा जवळील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी घेतली. दोन चिमुकल्यांसह आईने नदीपात्रात उडी घेतल्याचे लक्षात येताच या ठिकाणी असलेल्या मच्छिमारांनी या तिघींनाही शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु यात केवळ सुविद्या कांबळे या मुलीचा मृतदेह आढळून आला. पूजा कांबळे व शिवानी कांबळे या दोघींचा शोध घेणे सुरू आहे.
घटनेची माहिती कळताच कुंडलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मच्छिमारांमार्फत शोधमोहीम सुरू केली आहे. ही घटना घरगुती वादातून झाली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करत असून, या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.































































