मुलगीच का झाली म्हणत पती-सासऱ्याचा जाच, महिलेची आत्महत्या

530

पोटी मुलाऐवजी मुलगी झाली म्हणून सततच्या जाचाला कंटाळलेल्या एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. लग्नाला 11 वर्ष झाल्यानंतरही पोटी मुलगा न होता मुलगी झाली याचा राग आल्याने सासरा आणि पती पीडितेचा जाच करत होते. त्या जाचाला कंटाळून महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 4 नोव्हेंबरला वडगाव शेरीत घडली. याप्रकरणी सासऱ्यासह पतीविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नयना सतिश लोंढे (वय 27, रा. वडगावशेरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सतिश लोंढे आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप नरके (वय 53, रा. तळेगाव-ढमढेरे ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयना आणि सतीश यांच्या लग्नांनंतर 11 वर्ष त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे सतीश आणि सासरा नयनाला त्रास देत होते. मात्र, तरीही नयना त्रास सहन करून राहत होती. काही महिन्यांपूर्वी नयनाला मुलगी झाली. मात्र, त्यानंतरही सतीशने नयनाचा छळ करून मुलगीच का झाली, मुलगा का नाही, असे म्हणत शारीरिक मानसिक त्रास दिला.

त्यामुळे सतीश आणि सासऱ्याच्या जाचाला कंटाळून नयनाने 4 नोव्हेंबरला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नयनाच्या अंत्यसंस्कारानंतर तिचे वडील दिलीप यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. सिसाळ अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या