
साधारणपणे शेतकरी बी-बियाणे किंवा अवजारांच्या खरेदीसाठी कर्ज घेतात. मात्र भोपाळमधील एका शेतकरी महिलेने चक्क शेतात जाण्यासाठी मला हेलिकॉप्टर हवंय, त्यासाठी मला कर्ज आणि परवाना द्या, अशी मागणी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे केलीय. त्यांच्या या पत्राची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
मध्य प्रदेशातील मंदासौर जिह्यातील बसंतीबाई लोहार या महिलेने ही अजब गजब मागणी केली आहे. याबाबत त्या म्हणाल्या, ’माझी 0.41 हेक्टर जमीन आहे. शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालतो. मात्र आमच्या शेतात जाणारा रस्ता गावातील काही गुंडांनी बंद केलाय. शेतात जाण्याच्या मार्गावर मोठा खड्डा खोदलाय. हा रस्ता पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी आजवर सरकारी दरबारात अनेकदा पायऱया झिजवल्या. तिथं कुणी माझी तक्रार ऐकून घ्यायलाही तयार नाही. त्यामुळे मला माझ्याच शेतात जाण्यासाठी एक हेलिकॉप्टर खरेदी करायचंय. त्यासाठी मला कर्ज आणि हेलिकॉप्टर चालवण्यासाठी परवाना हवाय.’