लोकल प्रवासात प्रसूती वेदना, रेल्वे स्थानकात बाळाचा जन्म

राम मंदिर रेल्वे स्थानकात मंगळवारी मध्यरात्री सतर्क प्रवासी आणि महिला डॉक्टरच्या प्रसंगावधानाने गर्भवती महिला व तिच्या बाळाचे प्राण वाचले. महिलेला लोकल ट्रेनच्या प्रवासात प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी धावा करीत असल्याचे पाहून सहप्रवासी विकास बेद्रे यांनी साखळी खेचून लोकल थांबवली. नंतर गर्भवती महिलेला स्थानकात उतरवले. यादरम्यान विकास यांनी विलेपार्लेतील डॉ. देविका देशमुख यांना व्हिडीओ कॉल करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार महिलेची यशस्वी प्रसूती केली.

विकास बेद्रे गोरेगाव येथून रात्री 12.40 वाजता चर्चगेट लोकलने जात असताना डब्यात एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. महिला गर्भवती असल्याचे आणि तिला प्रसूती वेदना होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ट्रेनची साखळी खेचून गाडी थांबवली. नंतर महिलेला खाली उतरवले. रेल्वे स्थानकातील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यामध्ये एकही महिला नव्हती. काही लोकांनी रुग्णवाहिका व डॉक्टरची मदत मिळवण्यासाठी फोन कॉल्स केले. परंतु, 20 मिनिटे मदत मिळाली नाही. अखेर विकास बेद्रे यांनी त्यांच्या परिचयाच्या डॉक्टर देविका देशमुख यांना मध्यरात्री दीड वाजता कॉल केला. त्यांनी व्हिडीओ कॉलवरुन मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली. त्यांच्या सल्ल्यानुसार विकास बेद्रे यांनी महिलेला मदत पुरवली आणि तिची सुखरूप प्रसूती झाली. विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांच्या तत्परतेमुळे महिला व तिच्या बाळाचे प्राण वाचले.