
सामना ऑनलाईन । देवरिया
प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या एका विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील या पीडित तरुणीचे गावातीलच एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तरुणीचा विवाह अन्य व्यक्तिशी झालेला असूनही पीडितेने तरुणाशी संबंध सुरूच ठेवले होते. तरुणीने प्रियकराच्या संगनमताने तिथून पळून जाण्याचा बेतही आखला होता आणि त्यानुसार ते दोघंही शुक्रवारी रात्री गौरीबाजार इथे पोहोचले. त्यावेळी तिथे असणाऱ्या तीन आरोपींनी तरुणाला मारहाण करून तिथून पळवून लावलं आणि तरुणीला पळवून नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
तिघांपासून स्वतःची सुटका करून तरुणीने पोलीस स्टेशन गाठलं आणि तिन्ही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवलं असून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.



























































