महिना लाखभर पगार घेणाऱ्या महिलेने न्यायालयात खोटे सांगितले, न्यायालयाने बदलला निर्णय

court

घटस्फोटानंतर नवऱ्याकडून भरगच्च पोटगी वसूल करण्यासाठी एका महिलेने न्यायालयात खोटी माहिती दिली. ही महिला नोकरी करत असून तिला महिना 1 लाख रुपये पगार आहे. नवऱ्याकडून पोटगी मिळविण्यासाठी महिलेने कोर्टात खोटी माहिती दिली. त्यामुळे महिलेच्या नवऱ्याला दर महिन्याला पंधरा हजार देण्याचे आदेश दिले होते. कुटुंब न्यायालयाच्या आदेशाविरोधात महिलेच्या पतीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. खरी माहिती समोर आल्यानंतर न्यायालयाने पोटगी पंधरा हजारावरुन कमी करत दहा हजार केली आहे.

बचाव पक्षाचे वकिल एपी लोगनाथन यांनी न्यायालयात सांगितले की, महिलेने आपली नोकरी आणि खोटी पगाराची स्लीप दाखवून न्यायालयाची दिशाभूल केली. त्यांनी न्यायालयात सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे दाखवली. महिलेने डिसेंबर 2022 मध्ये आपल्या पगाराच्या स्लीपमध्ये 87 हजार 876 रुपये दाखवण्यात आली होती. लोगनाथन यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी फक्त वडिलांची नाही तर आई-वडिल दोघांची असते. त्यामुळे स्वत:च्या फायद्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करू शकत नाही.

हे प्रकरण 2022 चे असून त्या जोडप्याला एक मुलगा आहे. ज्याच्या पालन पोषणासाठी पत्नीने 15 हजार रुपये महिना भत्ता मागितला होता. ही पोटगी मिळविण्यासाठी तिने आपला खरा पगार लपवला आणि न्यायालयासमोर खोटी कागदपत्र दाखवण्यात आले. आता प्रकरण समोर आल्यानंतर न्यायालयाने पोटगीची रक्कम पाच हजार रुपये कमी करुन दहा हजार रुपये केली आहे. त्यामुळे पत्नीला दरमहा दहा हजार रुपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे.