
प्रेमास प्रतिसाद देत नसल्याच्या रागातून भिवंडीत एका महिलेची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह जाळण्यापर्यंत विकृत माथेफिरूची मजल गेली. सरितादेवी महतो (३३) मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली असून संजय मुकादम उर्फ द्वारकाप्रसाद वर्मा (४२) असे त्याचे नाव आहे.
भिवंडीतील पद्मानगर परिसरात राहणाऱ्या सरितादेवी यांच्याशी संजय मुकादम याची ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत संजय वारंवार सरितादेवी यांना फोन करून त्रास देत होता. सरितादेवी फोनवर बोलत नाही तसेच प्रेमसंबंध ठेवत नाही याचा राग आल्याने ११ मे रोजी संजयने सरितादेवी यांना आपल्या घरी बोलावून घेतले. यावेळी सरितादेवी यांनी त्याला आपल्याला त्रास देऊ नको असे बजावले. यावेळी दोघांमध्ये भांडण झाले. वाद वाढत गेल्यानंतर संजयने सरितादेवी यांची हत्या केली.
दरम्यान, महिला बेपत्ता असल्याची तक्रार भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांचे पथक करीत होते. गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसताना व मृतदेहाची ओळख पटवून गुन्हे शाखेने संजय मुकादम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मृतदेह प्लास्टिक पोत्यात भरला
हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह घरातच ठेवला. मध्यरात्री अडीच वाजता महिलेचा मृतदेह प्लास्टिक पोत्यात भरून पद्मानगर परिसरातील दुर्गा प्रसाद हॉटेलजवळील मैदानात नेला. त्या ठिकाणी यंत्रमाग कारखान्यातील धाग्यांचा वापर करून मृतदेह जाळून टाकला




























































