पाय हलवू नकोस सांगितल्याने राग आला, हातपाय बांधून पतीच्या खुनाचा प्रयत्न

पाय हलवू नको, असे म्हटल्याने नवविवाहितेने पतीला दोरीने बांधले. त्यानंतर पतीच्या गळ्यावर व हातावर चाकूने वार करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी – चक्रपाणी वसाहत येथे शनिवारी (दि. १६) ही घटना घडली. विजयसिंह शहाजी गायकवाड (वय २८, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी याबाबत माहिती दिली.

फिर्यादी विजयसिंह यांचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी विजयसिंह यांनी सासऱ्यांचा अपमान केला होता. या अपमानामुळे सासरे लेकीसमोर रडले होते. त्यामुळे विजयसिंह यांच्याबद्दल त्यांच्या पत्नीच्या मनात राग होता. १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास विजयसिंह हे पत्नीसोबत घरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पत्नी सतत पाय हलवत होती. विजयसिंह यांनी पत्नीला पाय हलवू नको. मी पाय न हलवता बसू शकतो, असे म्हणाले. याचा पत्नीला राग आला. त्यातच वडिलांच्या अपमानाचा तिला राग होता. तिने पती विजयसिंह यांना ‘मी तुमचे पाय बांधते, तुम्ही तसेच बसून दाखवा,’ असे म्हटले. त्यास विजयसिंह यांनी होकार दिला. त्यानंतर पत्नीने त्यांचे हातपाय दोरीने बांधले. तोंडावर चिकट टेप लावला. कपड्याने डोळे झाकले. विजयसिंह यांच्या छातीवर बसून त्यांच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. फौजदार भवारी तपास करीत आहेत.