आरक्षण मिळत नसल्यामुळे निराशेपोटी मराठा तरुणीने विष घेतले

सामना प्रतिनिधी । शिराढोण, ढोकी

मराठा आरक्षणाबाबत फडणवीस सरकार घेत असलेली वेळकाढूपणाची भूमिका तसेच शेतकऱ्यांबाबत असणाऱ्या नकारात्मक धोरणामुळे निराश झालेल्या कळंब तालुक्यातील देवळाली येथील तृष्णा तानाजी माने या (१९) तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

तृष्णा तानाजी माने ही युवती मूळची कळंब तालुक्यातील देवळाली येथील असून, सध्या ती धाराशिव येथील व्ही. जे. कॉलेजमध्ये बी. कॉम द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मूक मोर्चात ती सहभागी झाली होती. परंतु शासन आरक्षणाच्या मागणीची दखल घेत नसल्यामुळे ती निराश होती.

त्यातच घरी २० एकर जमीन असूनही केवळ शेतमालाला भाव नसल्यामुळे वडिलांची होणारी परवड तिला पाहवत नव्हती. ढोकी येथील स्टेट बँकेकडून वडिलांनी घेतलेले ३ लाख रुपयांचे कर्ज फेड न झाल्याने १२ लाखांवर पोहोचले. हे कर्ज कसे फेडणार याची चिंता तिला सतत सतावत होती. शेतमालाला हमीभाव नाही आणि आरक्षण नसल्यामुळे शिक्षणाचाही उपयोग नाही अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या तृष्णाने २९ जुलै रोजी विष घेतले. मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आपण विष घेतल्याचे तिने भावाला सांगितले. तृष्णाला धाराशिव येथील पल्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच काल तृष्णाचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यविधीसाठी देवळाली येथे तृष्णाचे पार्थिव आणण्यात आले. परंतु देवळाली ग्रामस्थांनी जोपर्यंत मदतीचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतला. तहसीलदार अशोक नांदलगावकर यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून या मागण्या शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.