आईचेही विवाहबाह्य संबंध असायला काय हरकत आहे; मुलीने सोशल मीडियावर व्यक्त केली इच्छा

आज संपूर्ण देश स्त्री शक्तीला सलाम करत आंतराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर एका मुलीने आपल्या आईला अनोख्या पद्धतीने  शुभेच्छा दिल्या आहेत. या मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आईकडे विचित्र इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या आईने एक्स्ट्रामॅरिटल अफेअर करण्याची मागणी तिने आईकडे केली आहे. तिच्या अशा मागणीमुळे तिला सोशल मीडियावर भरपूर ट्रोल केल जातंय.

एका 52 वर्षीय महिलेच्या मुलीने  रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिले की, माझी आई तिच्या वैवाहिक जीवनात नाखूश आहे असे मला वाटतेय. याचे कारण फक्त आणि फक्त माझे वडिल आहेत. त्यांच्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी दोघेही एकमेकांशी जास्त बोलत नाही. माझी आई रोज त्यांच्यासाठी जेवण बनवते मात्र ते कधी आवडीने खात नाहीत. कधी प्रेमाने दोन शब्द देखील बोलत नाहीत. त्यामुळे माझ्या आईने एक्स्ट्रामॅरिटल अफेअर करावे अशी माझी इच्छा आहे. त्यांमुळे ती नेहमी आनंदी राहिल असे मला वाटते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या पतीवर खूप प्रेम करते. कोणत्याही परिस्थितीत ती तिच्या नवऱ्याला सोडू शकत नाही. परंतु मुलीला असे वाटते की तिची आई जबरदस्तीने हे नाते टिकवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे ती मुलगी तिच्या आईसाठी डेटिंग वेबसाइट्सची सदस्यता घेण्याचा विचार करत आहे. कारण येत्या मातृदिनापर्यंत या वेबसाईटच्या माध्यमातून तिच्या आईला नवा जोडीदार मिळावा अशी तिची इच्छा आहे.

सोशल मीडियावर मात्र नेटकऱ्यांनी या मुलीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिलेय की, अफेअर केल्यामुळे कोणाचे भले होत नाही. याउलट नात्यांमध्ये दुरावा येतो. तुझ्या आईच्या मनात असं काही असतं तर तिने ते खूप आधी केलं असतं. तर, दुसऱ्याने लिहिले आहे की, नातं तुटण्यापासून वाचवण्याऐवजी तुम्ही ते तोडण्याचा प्रयत्न करत आहात. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, आई आणि वडिलांमध्ये तेढ निर्माण करण्याऐवजी त्यांचे लग्न वाचवण्यासाठी काहीतरी चांगले करा आणि त्यांना मदत करा.