प्रासंगिक – मेणाहून मऊ आणि वज्रापेक्षा कठोर

>> दत्ता पवार

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढय़ाच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला आहे.

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महिलांचे हक्क नाकारले होते. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण होते. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया संघर्ष करीत होत्या. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत सर्व जगात स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती. म्हणूनच समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या, मात्र एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमध्ये जागृती येऊ लागली. त्यातूनच स्त्री वादाचा जन्म झाला. पुरुषांइतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संधीही उपलब्ध नव्हत्या आणि मग आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या. स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे. एकोणिसाव्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरला होता, त्याच वेळी हिंदुस्थानातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर होणाऱया अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजा राममोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाही. तरीसुद्धा आज महिलांचे प्रश्न सुटले का? समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला का? दुय्यम वागणुकीतून त्यांची मुक्तता का झाली नाही? आजही हुंडय़ासाठी महिलेला जाळून मारलं जातं, तिच्यावर अनेक निर्बंध लादले जातात, ती आजही कौटुंबिक छळाला सामोरं जात आहे. लोकांच्या वखवखलेल्या नजरांचा आजही तिला सामना करावा लागत आहे. याचे कारण म्हणजे आपला पुरुषप्रधान समाज हेच आहे.

फक्त महिला दिन आला की तिच्या स्वावलंबनतेच्या गप्पा मारल्या जातात, पण एरवी तिचा गळाच दाबला जातो. तिला अनेक कौटुंबिक आणि सामाजिक बंधने आहेत. ती स्वैरपणे वावरू शकत नाही. पुरुषानं काही केलं तरी माफ होतं, पण एका महिलेला काहीच माफ नसतं. तिला प्रत्येक चुकीची किंमत चुकवावी लागते. तिच्यात निर्णय घ्यायची क्षमता असली तरी ती निर्णय घेऊ शकत नाही. सरपंच महिला असेल तरी कारभार तिचा पती बघतो. असं अनेक क्षेत्रात आपल्याला बघायला मिळतं. नुसते दिवस साजरे करून तिला स्वातंत्र्य मिळणार नाही. त्यासाठी पुरुषप्रधान समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिला आज कुठे नाही? ती विमान चालवते, रेल्वे चालवते, डॉक्टर आहे, नर्स आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने आपलं प्राबल्य दाखवून दिलं आहे. तिने आपलं स्वत्व सिद्ध केलं आहे. तरीसुद्धा तिला दुय्यम वागणूक मिळत आहे. आजही तिची गर्भात हत्या केली जात आहे. हिंदुस्थानच्या महान असणाऱया संस्कृतीमध्ये स्त्रीला खूपच मानाचा दर्जा दिला गेला आहे. तिला मांगल्याचे आणि प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे. तसेच तिने शेकडो वर्षांपासून अनेक आघाडय़ांवर सामाजिक आणि राजकीय नेतृत्व करून आपले क्षत्रियत्व सिद्ध केल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात उद्भवलेले कसोटीचे प्रसंग असो वा इंग्रजांच्या काळात घडलेल्या घटना असो, ‘ती’ आपल्या नेतृत्व गुणांच्या कसोटीला उत्तमरीत्या उतरलेली आपण बघितलेली आहे. स्त्री असूनही पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक भावभावना समजून घेण्याची ताकद निसर्गाने फक्त स्त्रीला बहाल केली आहे. म्हणूनच तिला ‘मेणाहून मऊ तसेच वज्रापेक्षाही कठीण’ म्हटले आहे. अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशाची शिखरे सर केली आहेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन!

आपली प्रतिक्रिया द्या